राज ठाकरे यांनी सपत्नीक कुलदैवत कोंडजाई देवी, बल्लाळेश्वराचे घेतले दर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज ठाकरे यांनी सपत्नीक कुलदैवत कोंडजाई देवी, बल्लाळेश्वराचे घेतले दर्शन

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सपत्नीक ठाकरे घराण्याचे कुलदैवत असलेल्या सुधागड तालुक्यातील कोंडजाई देवीचे मंगळवारी (ता.4) दर्शन घेतले.

राज ठाकरे यांनी सपत्नीक कुलदैवत कोंडजाई देवी, बल्लाळेश्वराचे घेतले दर्शन

पाली - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सपत्नीक ठाकरे घराण्याचे कुलदैवत असलेल्या सुधागड तालुक्यातील कोंडजाई देवीचे मंगळवारी (ता. 4) दर्शन घेतले. तसेच कोंडजाई देवीची खणा नारळाने ओटी भरून मनोभावे आरती व पूजा केली. तसेच अष्टविनायकापैकी एक गणपती श्री बल्लाळेश्वराचे दर्शन घेतले. यावेळी बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट पाली यांच्या वतीने राज ठाकरे यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी राज ठाकरे यांना पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती.

पालीत राज ठाकरे यांचे गगनभेदी घोषणा, फटाक्यांची आतषबाजी व ओवाळणी करून जल्लोषात स्वागत करण्यात आले. राज ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर पाली खोपोली राज्यमहामार्गावर पाली फाटा, परळी, जांभूळपाडा, पेडली, वाकण, पाली शहर, पाली ते नागशेत मार्ग तसेच ठिकठिकाणी मोक्याच्या जागेवर, नाक्यानाक्यावर झळकत होते. दर्शन घेतल्यानंतर राज ठाकरे यांच्या समवेत एखादी सेल्फी क्लिक व्हावी यासाठी चाहत्यांनी इच्छा व्यक्त केली व राज ठाकरे यांनी ती पूर्णही केली.

सलग दोन वर्षे कोरोनाच्या महामारीत शासन निर्बंध असल्याने राज ठाकरे व कुटुंबीयांना नवरात्रोत्सवात येऊन प्रत्येक्ष दर्शन घेता आले नव्हते. राज ठाकरे दरवर्षी आपल्या कुटुंबीयांसह कोंडजाई देवीचे दर्शन घेतात.

राज ठाकरे हे पत्नी शर्मिला ठाकरे यांच्यासह कोंडजाई देवी परिसरातील निसर्गरम्य वातावरणात काही काळ रमून गेले, घनदाट वृक्षवल्ली, मनमोहक हिरवळ, पांढरे शुभ्र खळखळणारे नदी व झऱ्यांचे निखळ पाणी पाहून ते दृश्य आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा कैद केले.

यावेळी त्यांच्या समवेत मनसे नेते बाळा नांदगावकर, शोभा देशपांडे, सचिन मोरे, गोवर्धनभाई पोलसानी, मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, मनसे जिल्हा अध्यक्ष देवेंद्र गायकवाड, मनसे महिला जिल्हा सचिव लता कळंबे, सुधागड तालुका अध्यक्ष सुनील साठे, सुधागड तालुका महिला अध्यक्ष संजीवनी अजय अधिकारी, हरीचंद्र तेलंगे, संदीप ठाकुर, रूपेश पाटील, पवित्र पोलसानी, साईनाथ धुळे, दिपश्री घासे, अजय अधिकारी, भावेश बेलोसे, सचिन झुंजारराव आदी पदाधिकारी, मनसे सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.