राष्ट्रवादीत फूट पाडणाऱ्या, बंडखोरी करणाऱ्यांचा बंदोबस्त करा

राजाभाऊ लिमये; बंडखोरी करणारे पक्ष संपवायला बसलेत
राष्ट्रवादीत फूट पाडणाऱ्या, बंडखोरी करणाऱ्यांचा  बंदोबस्त करा

रत्नागिरी : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडणाऱ्यांचा बंदोबस्त करा, हे कुमार शेट्येंचे वक्तव्य म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा. रत्नागिरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय कुमार शेट्येंनी बंद केले. आता स्वतःचे कार्यालय काढून दुसऱ्या पक्षातून आलेले दोन, चार पदाधिकारी बरोबर घेऊन पक्षातील पदाधिकाऱ्यांबद्दल कट कारस्थान सुरू आहे. पक्षात फूट पाडणे आणि बंडखोरी करणे यांची पूर्वापार सवय आहे. पक्षात फाटाफूट पाडण्याचे काम करणाऱ्या कुमार शेट्येंना पक्षहितासाठी पक्षातून काढून टाका, अशी मागणी पक्षात जोर धरू लागली आहे, अशी माहिती ज्येष्ठ नेते राजाभाऊ लिमये, प्रांतिक सदस्य बशीरभाई मुर्तुझा, पक्षप्रतोद सुदेश मयेकर यांनी दिली.

रत्नागिरी तालुका आणि शहरातील पक्ष संघटनांतर्गत कुमार शेट्ये यांचा पोरखेळ सुरू आहे. पक्षात फूट पाडणे, बंडखोरी करणे यांची पूर्वापार सवय आहे आणि ते सर्व रत्नागिरीतील जनतेला ज्ञात आहे. रवींद्र ऊर्फ भाऊ सुर्वे ज्या वेळी विधानसभेला उभे राहिले, त्या वेळी कुमार शेट्येंनी सभापती असताना पक्षाच्या विरोधात बंडखोरी केली. २०१४ मध्ये बशीर मुर्तुझा विधानसभेला उभे राहिले होते, त्या वेळीही पक्षाच्या विरोधात काम केले. त्यानंतर २०१६ मध्ये उमेश शेट्ये नगराध्यक्षपदासाठी उभे राहिले, त्या वेळीही पक्षाच्या विरोधात काम केले. असा हा माणूस पक्ष संपवायला बसला आहे, असे लिमये, मुर्तुझा, मयेकर यांनी सांगितले.

राष्ट्रवादीत फूट पाडणाऱ्या, बंडखोरी करणाऱ्यांचा  बंदोबस्त करा
आंबा उत्पादकांच्या अडचणींवर सकारात्मक मार्ग काढू : उद्धव ठाकरे

कुमार शेट्ये यांनी आता मार्गदर्शन करायचे सोडून प्रदेश कार्यालयात फेऱ्या मारून याला काढा, त्याला काढा, अशा नको त्या उचापती सुरू आहेत. पक्षाच्या नावाने कार्यालय काढायचे आणि काही जणांना बरोबर घेऊन पक्षात उचापती करायच्या, हेच त्यांचे दैनंदिन काम अनेक वर्षांपासून सुरू आहे. पालिकेची निवडणूक ही विधानसभा लढविलेले उमेदवार आणि शहराध्यक्ष त्याचबरोबर तालुकाध्यक्ष यांना बरोबर घेऊन पालिका निवडणुकीचे धोरण निश्चित करणे गरजेचे आहे. असे असताना अन्य पदाधिकाऱ्यांची नावे टाकून पक्षात गट-तट करून फूट पाडणारा हा म्होरक्या कोण आहे, तो सर्वांना माहिती आहे. रत्नागिरीतील सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आमच्याशी फोनवरून संपर्क करून आणि प्रत्यक्ष भेटले. पक्षात हे नेमके काय चालले आहे? पक्षात फाटाफूट पाडण्याचे काम कुमार शेट्येच करीत आहेत. त्यांना ती पूर्वीपासूनची सवय असल्याने पक्षहितासाठी कुमार शेट्ये यांना पक्षातून काढून टाका, अशी मागणी केल्याचे तिघांनी सांगितले.

प्रदेशाध्यक्षांकडे कारवाईबाबत तक्रार

पक्षातील पदाधिकाऱ्यांची निवड झाली आहे, ते सगळे तोंडी निवड न करता निरीक्षकांनी इथे येऊन अहवाल तयार करून नियुक्त्या केलेल्या आहेत. कुमार शेट्ये आपल्याच मुलांना आणि मर्जीतील माणसांना पक्षातील पदे कशी मिळतील, याचा विचार करून पक्षात फूट पाडत आहेत. त्यांच्यावर कारवाई करा, असे आपण सर्व पदाधिकाऱ्यांच्या सह्या घेऊन प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे मागणी करणार आहोत, असेही लिमये, मुर्तुझा, मयेकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com