
कणकवली (सिंधुदुर्ग) : वैभववाडी नगरपंचायतीमधील 7 नगरसेवकांच्या जाण्याने भाजपचे काहीही नुकसान होणार नाही. उलट आगामी निवडणुकीत भाजपचे सर्व 17 उमेदवार निवडून येतील, असा विश्वास भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज येथे व्यक्त केला.
येथील भाजप कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, वैभववाडी नगरपंचायतीमधील जे सात नगरसेवक शिवसेनेत गेले, त्यातील तीन अपक्ष होते. तसेच नगरपंचायत निवडणुकीत आरक्षण पडल्याने हे सर्व नगरसेवक चलबिचल झाले होते. त्यांच्या जाण्याने भाजपवर कोणताही परिणाम होणार नाही. वस्तुतः नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शिवसेनेची मोठी पडझड झाली. त्यामुळे आपण काहीतरी करतो आहे हे पक्षश्रेष्ठींना दाखविण्यासाठी नगरसेवक फोडाफोडीचे प्रकार शिवसेनेकडून सुरू झाले आहेत.
...तर पुन्हा निवडून या
तेली म्हणाले, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर खासदार विनायक राऊत आज टीका करत आहेत; पण लोकसभा निवडणुकीत मोदींचे छायाचित्र आणि भाजपशी युती नसती तर राऊतांची काय अवस्था असती याचा आधी विचार त्यांनी करावा. त्यांना स्वबळाची एवढीच खुमखुमी असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडून येऊन दाखवावे.
शहांच्या दौऱ्यामुळे शिवसेना सैरभैर
केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे शिवसेनेच्या पोटात गोळा आला आहे. शिवसेनेची मंडळी सैरभैर झाली आहेत. यातूनच ही नेतेमंडळी भाजपवर आगपाखड करत आहेत; पण अमित शहा यांनी 370 कलम रद्द करुन इतिहास रचला आहे. देशात वेगळ्या पद्धतीने दबदबा निर्माण केला आहे.
विमानतळाचे वास्तव जनतेला सांगा
कोकणची शिवसेनेने चेष्टा लावली आहे. खासदार राऊत यांनी 1 मार्चला विमान उडणार, अशी घोषणा केली; मात्र अजूनही विमानतळ सुरू करण्यासाठी डीजीसीएचे लायसन्स मिळाले नाही. विमानतळासाठी पाणी पुरवठ्याची व्यवस्था झालेली नाही. कायमस्वरूपी वीज जोडणी झालेली नाही. त्यामुळे जनतेला स्वप्न दाखवू नका. तर वास्तव सांगा असे तेली म्हणाले.
संपादन - स्नेहल कदम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.