
शिवसेना, की राष्ट्रवादी? याचे उत्तर सतत विकासनिधी कमी पडु देणार नाही, अशी बतावणी करणाऱ्या पालकमंत्र्यांनी द्यावे.
वैभववाडी (सिंधुदुर्ग) : निसर्ग चक्रीवादळ असो किंवा भात नुकसान भरपाई राज्याने तुटपुंजी मदत केली आहे. विकास निधी देतानाही हात आखडता घेतला जात आहे. त्यामुळे शिवसेनेला भरभरून देणाऱ्या कोकणावर नेमका राग कोण काढतेय? शिवसेना, की राष्ट्रवादी? याचे उत्तर सतत विकासनिधी कमी पडु देणार नाही, अशी बतावणी करणाऱ्या पालकमंत्र्यांनी द्यावे, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी येथे केली.
दोन दिवसांपुर्वी पालकमंत्री सामंत आणि खासदार विनायक राऊत यांनी शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात विविध मुद्यांवरून खासदार नारायण राणेंवर टीका केली होती. त्या पार्श्वभूमीवर आज तेली यांची येथील भाजप संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी तालुकाध्यक्ष नासीर काझी, महिला तालुकाध्यक्षा भारती रावराणे, युवा मोर्चा अध्यक्ष किशोर दळवी, सुधीर नकाशे, अरविंद रावराणे, बाळा हरयाण, दिगंबर मांजरेकर, बाबा कोकाटे, उदय पांचाळ आदी उपस्थित होते.
हेही वाचा - शिवसेनेचा ग्रामपंचायतीवरील वरचष्मा कमी करण्यात भाजप यशस्वी होईल का?
तेली म्हणाले, ‘‘पालकमंत्री जिल्हयाला निधी कमी पडु देणार नाही असे सतत सांगत आहेत; परंतु जिल्हा नियोजनचा आराखडा २४० कोटीवरून १४० कोटींवर आला. निसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांना तुटपुंजी मदत सरकारने दिली. भात नुकसान भरपाईसाठी १० कोटींची गरज होती; परंतु प्रत्यक्षात २९ लाख रुपये सरकारने दिले. भाजप सरकारच्या काळात मंजुर विकासकामेही या सरकारने सुरू केलेली नाहीत हे वास्तव असताना पालकमंत्री आणि खासदार कुठल्या निधीचा बाथा मारत आहेत? ज्या शिवसेनेला कोकणाने भरभरून दिले त्याच कोकणावर राग काढला जात आहे. हा राग नेमका कोण काढतेय याचे उत्तर पालकमंत्र्यानी द्यावे. निव्वळ विकास निधीच्या वल्गना करू नये.’’
तेली म्हणाले, ‘‘उड्डाण योजनेतून चिपी विमानतळाला मंजुरी घेतली आहे. त्यात माजी खासदार सुरेश प्रभू आणि खासदार नारायण राणेंचे मोठे योगदान आहे. त्यामुळे ‘चिपी’चे श्रेय खासदार राऊत यांनी घेवू नये. राणेंच्या मेडिकल कॉलेजला विरोध म्हणुन सरकारी कॉलेजची घोषणा झाली आहे. ते कॉलेज कधी होईल तेव्हा होईल; परंतु तत्पुर्वी आरोग्य विभागातील रिक्त पदे सत्ताधाऱ्यांनी भरावीत. जर पालकमंत्री आणि खासदारांमध्ये हिंमत असेल तर एखादे मेडिकल कॉलेज त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यात सुरू करावे. जिल्ह्यात भाजप कुठे आहे असे म्हणणाऱ्यांनी कणकवलीतील ट्रॅक्टर रॅलीचा धसका
घेतला आहे.’’
हेही वाचा - मच्छीमाराचा बुडून मृत्यू झाल्याची घटना मध्यरात्री घडली
६५ ग्रामपंचायतींवर भाजपची सत्ता
जिल्ह्यातील ७० पैकी ६५ ग्रामपंचायतींवर भाजपची सत्ता येणार आहे. याशिवाय लवकरच होणाऱ्या नगरपंचायत निवडणूक आणि त्यानंतर होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत देखील भाजपचाच वरचष्मा दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संपादन - स्नेहल कदम