साळगावकरांना राजकीय नैराश्‍य ः  तेली

रुपेश हिराप
Thursday, 7 January 2021

तेली म्हणाले, ""साळगावकर यांचा दोन वेळा झालेला पराभव लक्षात घेता ते सध्या नैराश्‍यातून जात आहेत. त्यामुळे त्यांच्यावर टीका न करता त्यांना नैराश्‍यातून सावरायला वेळ दिला पाहिजे.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर हे राजकीय नैराश्‍यातून जात आहेत. त्यामुळे त्यांना सावरायला वेळ दिला पाहिजे. आठ वर्षे नगराध्यक्ष पद भूषवलेल्या साळगावकर यांना 308 मतांवर समाधान मानावे लागत आहे. त्यांच्यावर काय बोलावे, अशी टीका भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज येथे केली. श्री. साळगावकरांच्या राजिनाम्यामुळेच श्री. परब यांना शहराच्या नगराध्यक्ष पदाचा बहुमान मिळाला. त्यामुळे साळगावकर यांना शुभेच्छा, असेही तेली म्हणाले.

माजी नगराध्यक्ष साळगावकर यांनी अलिकडेच पत्रकार परिषद घेऊन भाजप जिल्हाध्यक्ष तेली यांच्यावर टीका केली होती. विधान परिषदेचे सदस्यत्व, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशी उच्च पदे भोगलेल्या तेली यांनी पालिकेच्या लोकमान्य टिळक सभागृहामध्ये राजकीय पक्ष प्रवेश घेऊन सभागृहाचा अपमान केला आहे. त्यांना सत्तेचा माज आला असून सभागृहाच्या अपमानाची माफी मागावी, अशी टीका केली होती.

याबाबत श्री. तेली यांना छेडले असता त्यांनी साळगावकर यांच्या टीकेला उत्तर दिले. यावेळी नगराध्यक्ष संजु परब, शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, नगरसेवक आनंद नेवगी, मनोज नाईक, अमित परब आदी उपस्थित होते. 
तेली म्हणाले, ""साळगावकर यांचा दोन वेळा झालेला पराभव लक्षात घेता ते सध्या नैराश्‍यातून जात आहेत. त्यामुळे त्यांच्यावर टीका न करता त्यांना नैराश्‍यातून सावरायला वेळ दिला पाहिजे.

खरेतर साळगावकर यांच्यामुळेच भाजपला शहरामध्ये काम करण्याची संधी प्राप्त झाली. त्यांच्या राजिनाम्यामुळे श्री. परब यांना नगराध्यक्षपदाचा बहुमान प्राप्त झाला. त्यामुळे त्यांना आमच्याकडून शुभेच्छा आहेत; परंतु ज्या साळगावकरांनी तब्बल आठ वर्ष या शहराचे नेतृत्व करत नगराध्यक्ष पद भूषवले त्या साळगांवकरांच्या झोळीत नगराध्यक्षपदाच्या पोट निवडणुकीत येथील शहरवासियांनी फक्त 308 मते टाकली. त्यामुळे साळगावकर यांच्यावर कितपत आणि काय बोलावे हा प्रश्‍न आहे. त्यामुळे साळगावकर यांनी उगाच बडबड न करता नैराश्‍यातून सावरावे.'' 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rajan Teli criticism baban Salgaonkar sawantwadi konkan sindhudurg