
राजेंद्र बाईत
राजापूर : शहरातून वाहणार्या अर्जुना-कोदवली नद्यांना पावसामध्ये सातत्याने येणार्या पुराचा राजापूर शहराला सातत्याने वेढा पडलेला असतो. या पुराच्या अनुषंगाने लघुपाटबंधारे विभागाने नवीन पूररेषा आखली आहे. सद्यःस्थितीत ज्या भागात पुराचे पाणी पोहोचते त्यापेक्षा कितीतरी पट उंच ठिकाणी पूररेषेचे करण्यात येत असलेले मार्किंग शहर विकासामध्ये अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे नव्या पूररेषेबाबत राजापूरवासियांसह व्यापारीसंघाकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. शहर आणि बाजारपेठेच्या विकासाच्या मुळावर येणार्या नव्या पूररेषेचे फेरसर्व्हेक्षण करण्यात यावे अन्यथा, त्या विरोधात वेळप्रसंगी तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्धार व्यापार्यांसह शहरवासियांकडून व्यक्त करण्यात येत असल्याने राजापूर शहरातील नवी पूररेषा आणि त्याची अंमलबजावणी वादाच्या भोवर्यात सापडली आहे.