
खासदार विनायक राऊत यांनीही साळवींचे हे व्यक्तीगत मत असल्याचे सांगत नाणारचा विषय संपल्याचा पुनरुच्चार केला
राजापूर - जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प आणि नाणार याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, लोकांना हवा असेल तसा निर्णय होईल, या आमदार राजन साळवी यांच्या वक्तव्याने राजापूरपासून मुंबईपर्यंत नाणार कल्लोळ उडाला. "मातोश्री'वर याची तातडीने दखल घेतली गेली. शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी साळवींचे हे वक्तव्य वैयक्तिक असल्याचे सांगितले. खासदार विनायक राऊत यांनीही साळवींचे हे व्यक्तीगत मत असल्याचे सांगत नाणारचा विषय संपल्याचा पुनरुच्चार केला. एकूणच साळवींच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटलेच.
कोकणामध्ये रोजगार, नोकऱ्याही नाहीत. त्यामुळे नाणार प्रकल्प व्हावा, अशी स्थानिकांची मागणी आहे. भविष्यामध्ये प्रकल्प व्हावा, अशी मागणी आल्यास नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री सकारात्मक प्रतिसाद देतील, अशी सूचक प्रतिक्रिया शिवसेनेचे आमदार साळवी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली होती. त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे आज संपूर्ण कोकणातील राजकीय वातावरण ढवळून निघाले.
तालुक्यामध्ये माडबन येथे जैतापूर अणूऊर्जा प्रकल्पासह नाणार परिसरामध्ये नाणार रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पांना स्थानिक जनतेच्या साथीने शिवसेनेने तीव्र विरोध केला आहे. वेळप्रसंगी अनेक वेळा आंदोलनेही छेडली आहेत. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध असल्याचे सांगितले जात असताना त्या परिसरातील प्रकल्पग्रस्त पाच गावांमधील सुमारे 95 टक्के प्रकल्पग्रस्तांनी शासनाकडील मोबदल्याची रक्कम स्वीकारली आहे. प्रकल्प विरोध मावळल्याचे बोलले जात आहे.
याबाबत जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाप्रमाणे शासनाने नाणार प्रकल्पातील जनतेला मोबदला दिला, तर शिवसेनेचा विरोध मावळेल का, अशा थेट सवालावर आमदार साळवी यांनी नाणार प्रकल्पासंदर्भात शिवसेना स्थानिक जनतेच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली. स्थानिक जनतेने विरोध केल्यामुळे आमच्या पक्षप्रमुखांनी तो प्रकल्प रद्द करून घेतला; मात्र कोकणात रोजगार नाहीत, नोकऱ्या नाहीत त्यामुळे प्रकल्प व्हावा, अशी स्थानिक जनतेची मागणी पुढे येत असून, भविष्यात प्रकल्प व्हावा, अशी स्थानिकांची मागणी आल्यास मुख्यमंत्री असणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे योग्य निर्णय घेतील, असा आशावाद आहे. नाणार प्रकल्प होण्यासाठी स्थानिक जनतेने पुढाकार घेतला तर निश्चितपणे राज्याच्या व जनतेच्या हितासाठी महाविकास आघाडी तसा निर्णय घेईल, असे आपल्याला वाटते, असे सूचक विधानही साळवी यांनी केले होते.
हे पण वाचा - आंदोलकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्याला ठेवले बांधून
नाणार हद्दपारच ः राऊत
खासदार विनायक राऊत यांनी साळवी यांचे मत झिडकारले. राऊत यांनी प्रतिक्रिया देताना नाणार रिफायनरीबाबत राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी व्यक्त केलेले मत त्यांचे वैयक्तिक मत आहे. त्या मताशी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे किंवा महाविकास आघाडीचा काही संबंध नाही. रिफायनरी प्रकल्प नाणार परिसरात कायमचा हद्दपार झाला आहे. मी याद्वारे सांगू इच्छितो की, रिफायनरी हा विषय कायमचा संपला आहे.
संपादन - धनाजी सुर्वे