
राजापूर : चिखलाचा सामना करीत लोकांचा प्रवास!
पावस : रत्नागिरी ते राजापूर या सागरी मार्गावरील गावखडी-बंडबेवाडी येथील दोन पुलांचे डांबरीकरणाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण झालेले नाही. त्यामुळे वाहनचालकांना पर्यायी मार्गावरील चिखलाचा सामना करीत प्रवास करावा लागत असल्याने वाहनचालकांमध्ये नाराजी आहे.
या सागरी मार्गावरील लहान-मोठ्या पुलांचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, गावखडी बंडबेवाडी येथील सागरी मार्गावर दोन मोठ्या पुलांचे काम हाती घेण्यात आले होते. हे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र, शुक्रवारपासून सुरू झालेल्या जोरदार पावसाने या कामात अडथळे आले आहेत.या दोन्ही पुलांच्या कामामुळे वाहतूक येथील मोरीतून मार्ग काढून वळवण्यात आली होती. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण होणे गरजेचे होते. दोन्ही पुलाच्या दोन्ही बाजूंच्या भरावाचे काम पूर्ण झाले असले तरी त्यावर खडी, डांबरीकरण झालेले नाही. त्यामुळे या पुलांवरून वाहतूक सुरू झालेली नाही.
वाहन चालविणे कठीण
दरम्यान, गेले दोन दिवस पडणाऱ्या जोरदार पावसामुळे पर्यायी मार्गावर चिखल आणि खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याने पर्यायी मार्गावरून वाहन चालवणे कठीण होणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
Web Title: Rajapur People Journey Facing Mud
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..