राजापूर तालुक्याचे होणार सखोल संशोधन

उन्नत महाराष्ट्र अभियानात निवड, माहिती जमविणार
Rajapur taluka will be thoroughly researched Selection in Unnat Maharashtra Abhiyan
Rajapur taluka will be thoroughly researched Selection in Unnat Maharashtra Abhiyan

राजापूर - गावपातळीवरील दैनंदीन जीवनावर परिणाम करणार्‍या समस्यांसह विविध सामाजिक व विकासाशी संबंधित प्रश्‍नांची संशोधनाद्वारे उकल करून त्यावर अचूक उपाययोजना शोधण्याच्या उद्देशाने राज्य शासनातर्फे ‘उन्नत महाराष्ट्र अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानासाठी रत्नागिरी जिल्ह्यातून राजापूर तालुक्याची निवड झाल्याची माहिती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुहास पंडीत यांनी दिली.

या अभियानांतर्गंत तालुक्यातील गावा-गावातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह लोकांशी विविध मुद्द्यांच्या अनुषंगाने थेट संवाद साधून सखोल अन् सविस्तर संशोधन केले जाणार आहे. या अभ्यास अन् संशोधनाद्वारे तयार करण्यात येणारा अहवाल वा अभ्यासप्रकल्प संबंधित गावासह राजापूर तालुक्यातील लोकांच्या दैनंदीन जीवनावर परिणाण करणार्‍या समस्यांची उकल करून त्या सोडविणे आणि त्या गावासह राजापूर तालुक्याच्या भविष्यातील सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त अन् दिशादर्शक ठरणार आहे.

उन्नत महाराष्ट्र अभिायानांतर्गंत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी संशोधन करून तयार केलेला अभ्यास प्रकल्प अहवालाची शासनासह पंचायत समिती आणि संबंधित ग्रामपंचायतीकडेही राहणार आहे. गावामध्ये लोकांच्या दैनंदीन जीवनावर परिणाम करणार्‍या कोणत्या समस्या आहेत, त्या समस्येसंबंधित सविस्तर माहिती, कोणत्या पायाभूत सुविधा वा संसाधनांची कमतरता आहे आदींची आगाऊ माहिती या अहवालाच्या माध्यमातून मिळणार आहे. जी माहिती गावातील विविध समस्या सोडविण्यासह त्याद्वारे गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पर्यायाने तालुक्याच्या गावविकासासाठी लोकप्रतिनिधींसह प्रशासनासाठी भविष्यामध्ये उपयुक्त ठरणार आहे.

या अभियानामध्ये शेती, पाणी, वाहतूक, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, गावातील लघुउद्योग, पर्यावरण, सार्वजनिक व्यवस्था, पायाभूत सुविधा, रोजगार या मुद्द्यांच्या अनुषंगाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून सर्व्हेक्षण करून प्रकल्प अहवाल तयार केले जाणार आहेत. यामध्ये संबंधित ग्रामपंचायतीने सर्व्हेक्षणासाठी जास्तीस जास्त मुद्यांना प्राधान्य दिले जावे असे अपेक्षित आहे. जेणेकरून, सर्व विषयांची उकल होण्यास आणि त्याद्वारे ती समस्या सोडवून गावविकास साधण्यास मदत होईल.

प्राध्यापकांची झाली कार्यशाळा

केस स्टडीसह संशोधनामध्ये सहभागी होण्याच्या उद्देशाने विविध महाविद्यालयांतील प्राध्यापकांची रत्नागिरी येथे गत महिन्यामध्ये कार्यशाळा झाली. यामध्ये कुडाळ येथील एसआरएम महाविद्यालय, देवगड येथील एसएच केळकर महाविद्यालय, रत्नागिरी येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालय, देवरूख येथील आठल्ये-सप्रे पित्रे महाविद्यालय, महाड कॉलेज, खेड येथील ज्ञानदीप कॉलेज, गोरेगाव कॉलेज, कणकवली कॉलेज, चिपळून येथील डीबीजे महाविद्यालय, रत्नागिरी येथील नवनिर्माण कॉलेज येथील प्राध्यापक सहभागी झाले होते. त्यांना प्रा. मिलींद सोहनी, श्री. बापट यांनी मार्गदर्शन केले. या बहुतांश महाविद्यालयातील विद्यार्थी या संशोधनामध्ये सहभागी होणार आहेत.

सरपंच, ग्रामसेवकांची झाली कार्यशाळा

उन्नत महाराष्ट्र अभियानातर्गंत राजापूर तालुक्यामध्ये प्रत्यक्ष संशोधन वा सर्व्हेक्षण करण्याच्या अनुषंगाने राजापूर येथे नुकतीच तालुक्यातील सरपंच आणि ग्रामसेवकांची कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेमध्ये गटविकास अधिकारी सुहास पंडीत, स्थानिक प्रकल्प समन्वयक हर्षद तुळपुळे यांनी या अभियानासह नेमके कशा पद्धतीने आणि कोणत्या मुद्यान्वये केस स्टडी होणार आहे, त्याचा भविष्यामध्ये गावविकासासाठी कसा उपयोग होणार आहे याची सविस्तर माहिती देण्यात आली.

कधी होणार सर्व्हेक्षणाला सुरूवात अन् कसा होणार अहवाल

या केस स्टडी वा सर्व्हेक्षणामध्ये ग्रामस्तरावर नेमक्या कोणत्या मुद्द्यान्वये सर्व्हेक्षण करायचे आहे हे निश्‍चित होवून त्याचा अहवाल पंचायत समितीला सादर केला जाणार आहे. त्यानंतर, पंचायत समितीकडून तालुक्याचा अहवाल तयार करून तो वरीष्ठ स्तरावर सादरीकरण केला जाणार आहे. त्यानंतर प्रत्यक्षात सर्वसाधारणतः या वर्षअखेरीला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमार्फत गावोगावी जावून लोकांसह स्थानिक स्वराज्य संस्था, सामाजिक संस्था आदींशी संवाद साधून, प्रत्यक्ष सर्व्हेक्षण वा केस स्टडीच्या कामाला सुरूवात होणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी सुहास पंडीत यांनी दिली. त्यानंतर, गावस्तरावर तयार झालेल्या अभ्यास प्रकल्प अहवालाचे पंचायत समितीच्या माध्यमातून एकत्रिकरण करून त्याचा एकत्रित तालुकास्तकरीय प्रकल्प अहवाल वरीष्ठस्तरावर सादर केला जाणार आहे.

संशोधक विद्यार्थ्यांना असा फायदा

उन्नत महाराष्ट्र अभियानांतर्गंत गावोगावच्या संशोधनामध्ये वा केस स्टडीमध्ये सहभागी होणार्‍या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लोकांशी संवाद साधून विविध समस्यांची उकल करण्याची अन् अभ्यासण्याची जवळून संधी मिळणार आहे. त्याचवेळी संशोधन केले म्हणून पदवी शिक्षणामध्ये विद्यापीठाकडून विशेष काही गुणही मिळणार असल्याची माहिती स्थानिक प्रकल्प समन्वयक हर्षद तुळपुळे यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com