राजवाडी पॅटर्न : जलव्यवस्थापनाचा यशस्वी कोकणी प्रयोग 

राजवाडी पॅटर्न : जलव्यवस्थापनाचा यशस्वी कोकणी प्रयोग 

पावसाळ्यात अडीचशे इंचाहून अधिक पाऊस, उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य हे दृश्‍य कोकणात अनेक ठिकाणी पाहायला मिळते. काही ठिकाणी नद्या, उपनद्या किंवा बंधाऱ्यांमुळे बारमाही पाणी उपलब्ध असते. पण दुर्दैवाने ते शेतापर्यंत आणण्यासाठी आर्थिक ताकद परिसरातील अल्प भूधारक शेतकऱ्यांमध्ये नाही. अशा ठिकाणी पाणी उचलण्यासाठी आणि त्याच्या बळावर पिकवलेल्या उत्पादनांसाठी संघटित ताकदीचा उपयोग करण्याचा यशस्वी प्रयोग संगमेश्वर तालुक्‍यातील (जि. रत्नागिरी) राजवाडी, धामणी, चिखली या तिन गावात साकार झाला आहे. पाणी योजना सामुहिक, पण उत्पादन वैयक्‍तिक हा फंडा राबवत तिन्ही गावातील मिळून शंभर एकर जमीन बारमाही ओलिताखाली आली. त्याचबरोबर याच बंधाऱ्यांमुळे पिण्याच्या पाण्याचे स्रोतही बळकट झाले आणि कडाक्‍याच्या टंचाई काळातही या गावांमध्ये टंचाई जाणवली नाही.

शेतकरी एकवटले

पारंपरिक पध्दतीने भातशेती आणि उर्वरित आठ महिने मोलमजुरी असा कोकणातील वर्षानुवर्षाचा रिवाज राजवाडी, धामणी, चिखलीतही होताच. दुबार पिकं घ्यायची इच्छा होती, पण आर्थिक पाठबळ आणि मार्गदर्शनही आवश्‍यक होते. ती जबाबदारी राजवाडीच्या पेम (पिपल्स एम्पॉविंरंग मूव्हमेंट) संस्थेचे अध्यक्ष सतिश कामत यांनी स्वीकारली. होतकरु तरुण संतोष भडवळकर, सुहास उर्फ बंड्या लिंगायत यांच्यासह मनोहर सुर्वे, गणेश सुर्वे, नंदकुमार मांजरेकर, सुरेश भडवळकर, विलास राऊत, सिताराम बाईत यांच्या पाठीशी ते ठाम उभे राहीले. पाणी नियोजनाची सुरुवात राजवाडीतून झाली. सरकारी अनुदानाच्या कागदी भेंडोळ्यात अडकून पडण्याचे शक्‍य तिथे टाळत स्वयंस्फुर्तीने आणि खासगी आर्थिक सहकार्याच्या जोरावर पाण्याचे उत्तम नियोजन करत बारमाही शेती यशस्वी केली.

श्रमदानातून आले पाणी अन्‌ फुलली बारमाही शेती
पहिल्या टप्प्यात दोन किलोमीटर अंतरावरील शिवकालीन योजनेच्या बंधाऱ्यावरुन पाणी लिफ्ट करण्याचा निर्णय झाला. राजवाडीतील 25 शेतकऱ्यांनी 2014 ला कृषी रत्न पुरुष बचत गट स्थापना केला. त्यावरून साडेचार लाखाची योजना राबवतन अडीच किलोमीटर अंतरावरुन श्रमदानाने पाईपलाईन टाकली. 15 अश्वशक्‍तीचा पंप बंधाऱ्यावर लावण्यात आला. पिण्याच्या पाण्याच्या विहिरीची पातळीही वाढली. बंधाऱ्यातील पाण्यावर शेती झाली. दुसऱ्या टप्प्यात राजवाडी-ब्राम्हणवाडीत पाऊण किलोमीटर अंतरावरील उपनदीवरुन पाणलोटमधून अकरा लाख रुपये खर्च करुन बंधारा बांधण्यात आला. दापोली कोकण कृषी विद्यापिठाचे विद्यमान संशोधक संचालक डॉ. पराग हळदणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे 65 एकर जमीन बारमाही ओलिताखाली आहे.

त्यात प्रत्येकाने आपापल्या जमिनीच्या क्षमतेनुसार चवळी, पावटा, कुळीथ, मुग कडधान्य यासह लालमाठ, मुळा या पालेभाज्या, भेंडी, गवार, वांगी, पडवळ, भोपळा, दुधी, कलिंगड या फळभाजांचे उत्पादन घेतले. दरवर्षी दोन ते अडीच लाखाचे उत्पन्न या शेतीमधून मिळत आहे. येथील कृषी रत्न, कृषी विकास पुरुष बचत गटांनी घेतलेल्या उत्पादनाला गावातच बाजारपेठ मिळाली. पण रास्त भावासाठी सतीश कामत यांनी रत्नागिरी शहरातील मित्र व हितचिंतकांचा 'राजवाडी भाजी ग्रुप" तयार केला. त्याद्‌वारे आठवड्यातून तीन वेळा रत्नागिरी शहरात तीन केंद्रांवर विक्री व्यवस्था केली. आताऍपद्वारे भाज्याच्या मागणी नोंदविण्यात येते.

डोंगर उतारावर लागवडीसाठी शेततळं
पाणी मिळाल्यानंतर बारमाही उत्पादन घेता येते याचा अंदाज आल्यानंतर राजवाडीतील ग्रामस्थांनी नवजीवन पुरुष गटाची स्थापना करुन शेततळं उभारले. राजवाडीच्या डोंगर उतारावरील 25 एकर जमीन फळबाग लागवडीखाली येणार आहे. गतवर्षी 30 बाय 30 आणि चार मीटर उंचीची शेततळ उभारले आहे. 35 लाख लीटर पाणी साठवण क्षमता आहे. गतवर्षीच्या पावसात ते काठोकाठ भरले होते. प्रयोग म्हणून त्यात मत्स्यपालन करण्यात आले आहे. या शेततळ्यासाठी दहा लाख रुपयांचा खर्च आला आहे.

ओलिताखाली आलेली जमीन

  • राजवाडी ः 65 शेतकरी 60 एकर शेतजमीन
  • धामणी ः 25 शेतकरी 25 एकर शेतजमीन
  • चिखली ः 18 शेतकरी 20 एकर जमीन

पावसाळ्यात भात पिक घेत होतो. शेतात दुबार पिक घेण्याची फार इच्छा होती. पहिल्या टप्प्यात 25 शेतकऱ्यांसाठी योजना राबवली. येथे पिकवलेली भाजी कडवईच्या बाजारात आणि रत्नागिरीत विक्रीसाठी पाठविली जाते.

- संतोष भडवळकर, राजवाडी

अर्धा किलोमीटर अंतरावर राजवाडी-ब्राम्हणवाडीतील शेतकऱ्यांच्या वीस एकर जमीनीपर्यंत पाणी नेण्यात आले. तिथे बारमाही शेतीला चालना मिळाली असून कडधान्य, पालेभाज्या, फळभाज्यांचे उत्पादन घेतो.

- सुहास उर्फ बंड्या लिंगायत

धामणी, चिखलीने गिरवला राजवाडीचा धडा

राजवाडी पॅटर्न शेजारच्या धामणी गावाने अवलंबला. प्रकाश भागोजी रांजणे, अमोल लोध, शांताराम बडद, प्रकाश बसवणकर, हरिश्‍चंद्र बडद यांच्या नेतृत्त्वाखाली श्रीगणेश शेतकरी उत्पादक गटाने पावले उचलली. कृषी रत्न गटातील सदस्यांसह कामत, बासुरी फाऊंडेशनची मदत महत्त्वाची ठरली. पाणी मिळाल्याने सहा एकर जमिनीत तीन वर्षात दीडशे टन केळीचे उत्पादन घेतले. या प्रकल्पासाठी दहा लाख रुपये खर्च आला. त्यातून दरवर्षी चार ते पाच लाखाचे उत्पन्न मिळत आहे. पुढचे पाऊल म्हणून तीन किलोमीटर अंतरावरील दोनशे फूट उंचीवर डोंगरातील भातशेती दुबार पिकाखाली आणण्याचा चंग बांधला. भगिरथ प्रयत्नांनी डोंगरात श्रमदानाने पाईपालाईन टाकली. गतवर्षी डिसेंबरमध्ये प्रायोगिक तत्त्वावर कुळीथ पेरला. दोनशे किलो उत्पादन मिळाले असून पुढील वर्षी मोठे उत्पादन घेतले जाणार आहे. एप्रिल, मे महिन्याच्या कडाक्‍याच्या उन्हात याच पाण्याचा उपयोग चिखलीतील त्या पंचवीस कुटुंबांना झाला. आजूबाजूला टंचाई असताना ही गावे पाण्यासाठी स्वयंपूर्ण होती.

नदीजवळची अडीच एकर जमीन पडकी होती. काही तरी करायचे अशी इच्छा होती. पण पाठिंबा नव्हता. राजवाडी येथील भाजी उत्पादनाचा प्रयोग कानावर आला होता. प्रत्यक्षात कामत आणि सहकाऱ्यांना जाऊन भेटलो. बैठकांवर बैठका झाल्या आणी धामतील 31 एकर जमीन ओलिताखाली आली.

- प्रकाश रांजणे, धामणी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com