पोस्टामुळे रक्षाबंधनाचे नाते कोरोनातही होतेय अधिक घट्ट..

सकाळ वृत्तसेवा
Monday, 3 August 2020

राखी पाठविण्यासाठी विशेष दळणवळण सेवा 

चिपळूण : गेल्या काही दिवसांत पोस्ट कार्यालयाने टाळेबंदीतही चांगली सेवा दिल्यामुळे रक्षाबंधनाच्या राख्याही पोस्टामार्फत पाठविण्याकडे वाढता कल आहे. कोरोनाच्या काळात राखी बंधनाच्या नात्याचे बंध पोस्टामुळे घट्ट झाले. टाळेबंदीच्या काळात भावाला पोस्टाने राखी पाठविण्याकडे बहिणींचा वाढता कल दिसून आला. 

हेही वाचा - ....अखेर चितारआळीतील व्यापाऱ्यांना दिलासा -

कोरोनामुळे लॉकडाउन झाले. सणासुदीला एकत्र भेटणारी आपली माणसं आता कधी भेटतील, असं वाटत असतानाच दळणवळणाचाही प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे वाहतुकीच्या विविध आधुनिक सेवेतून बहिणीने भावाला राखी पाठविणेही कठीण होऊन बसले. पूर्वी पोस्टावर अवलंबून असणारी बहीण राखीसाठी इतर माध्यमांचाही वापर करू लागल्यामुळे भावाला खात्रीने राखी मिळणार, असा विश्वास असायचा. मात्र, टाळेबंदीमुळे वाहतूक व्यवस्थेवर निर्बंध आले आणि हवी ती वेळेत पोहोचेलच, याची शाश्वती राहिली नाही.

हेही वाचा -  रोज तुडुंब गर्दी, आता मात्र पूर्णतः शुकशकाट...

यावर्षी मात्र ६० ते ७० टक्के राख्या पोस्टाने पाठवण्याकडे बहिणींचा कल दिसला. त्याचबरोबर दरवर्षी राख्या उशिरा पाठवल्या जात असायच्या. टाळेबंदीमुळे त्या लवकर भावाकडे पोचविण्याची दक्षता घेतली जात आहे. यंदा रेल्वेसह इतर सार्वजनिक वाहतूक वाहनेही बंद आहेत. त्यामुळे भावाकडे जाऊन रक्षाबंधन करणे बहिणींना कठीण जाणार असल्याचे लक्षात घेऊन अगदी पंधरा दिवसांपूर्वीच राख्या पोस्टाने पाठवित आहेत. त्यामुळे कार्यालयातही गर्दी दिसतेय.

आकर्षक लिफाफा
भारतीय पोस्ट विभागाने यंदा रक्षाबंधनासाठी विशेष लिफाफा तयार केलेला आहे. आकर्षक रंगसंगतीचा वापर करून तयार केलेल्या या लिफाप्याची किंमत दहा रुपये असून तो पोस्ट कार्यालयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raksha bandhan festival and relation tight of brother and sister in corona