रत्नागिरी जिल्ह्यात साधेपणाने साजरी होणार रमजान ईद ; नो शॉपिंग चे आवाहन...

मुझफ्फर खान
शुक्रवार, 22 मे 2020

खरेदीला बाहेर पडू नये, गरजूंना मदत करण्याचे आवाहन

चिपळूण - कोरोना लॉकडाउनच्या संकटांचा सामना करीत असताना यंदाची रमजान ईददेखील साधेपणाने साजरी करण्याचा निर्णय मुस्लिम समाजातील अनेकांनी घेतला आहे. कोणतीही खरेदी न करता ही ईद साजरी केली जावी, असे आवाहन मुस्लीम समाजातील विविध संघटनांकडून करण्यात आले आहे. अनेकांनी याबाबतचे डीपी सोशल मीडियावर ठेवले आहे.

'नो शॉपिंग’चे आवाहन

इस्लाम धर्मात अत्यंत महत्त्वाची समजली जाणारी रमजान ईद या महिन्यात 25 तारखेला साजरी केली जाणार आहे. यावर्षी करोना विषाणूची भीती आणि सध्या सुरू असलेले लॉकडाउन यामुळे या उत्साहावर काही प्रमाणात नियंत्रण घालण्यात आले आहे. या संकटकाळात अधिक जबाबदारीने वागत रमजानची ईद अत्यंत साधण्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय मुस्लीम समाजाने घेण्यात आला आहे. त्याची पहिली सुरवात दापोली येथून करण्यात आली. त्यानंतर चिपळूण, रत्नागिरी व इतर तालुक्यातील मुस्लीम समाजाने साधेपणाने ईद साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. रमजान महिन्यात आणि ईदच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यात येते. मात्र, यंदाची परिस्थिती लक्षात घेऊन नागरिकांनी अशी खरेदी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. अनेकांनी सोशल मीडिया अकाउंट्सचे डीपी बदलले असून त्यातून  ’नो शॉपिंग’चे आवाहन केले आहे.

वाचा - सुनेला उंबऱ्यात रोखलं; अख्ख कुटुंब वाचलं... काय झालं वाचा ?
 

यंदा रत्नागिरीतच...

ईदनिमित्त आपापल्या मूळ गावी जाऊन संपूर्ण कुटुंबासमवेत ईद साजरी करण्याचा शिरस्ता पाळणारी कुटुंबे जिल्ह्यात आहेत. यातील काहींच्या या शिरस्त्यात खंड पडणार आहे. कोरोनाची लागण होण्याची भीती आणि प्रवासावर आलेली बंधने यामुळे यंदा मूळ गावी न जाता जिल्ह्यातच ईद साजरी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे काही मुस्लिम बांधवांनी सांगितले. आपल्या कुटुंबाला तसेच ज्या गावात जाऊ तेथे कुणाला त्रास होऊ नये, म्हणून अनेकांनी ईदला जिल्ह्यातच राहणे पसंत केले आहे.
 

गोरगरीबाला मदत करणे याचे दुसरे नाव इस्लाम आहे. रमजानची खरेदी न करता त्या पैशातून गरिबांना मदत करावी. मुस्लीम बांधवांनी घरातच ईदची नमाज पठण कारावी आणि कोरोनाच्या धोक्यापासून स्वतः वाचून दुसर्‍याला वाचवावे.

- यासीन दळवी, परवाज एज्युकेशन अ‍ॅण्ड वेल्फेअर सोसायटी चिपळूण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ramadan Eid will be celebrated simply in Ratnagiri district