काही सुखद ! प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शेतातील एका पेरूचे वजन पाऊण किलो 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 मे 2020

पोलादपूर तालुक्‍यातील चाळीचा कोंड येथील त्रिवेणी संगमावर प्रयोगशील शेतकरी रामचंद्र कदमशेठ यांनी पेरूची लागवड केली आहे. त्यांनी उत्पादित केलेल्या एका पेरूचे वजन अर्धा ते पाऊण किलो इतके आहे.

खेड ( रत्नागिरी)  - पोलादपूर तालुक्‍यातील चाळीचा कोंड येथील त्रिवेणी संगमावर प्रयोगशील शेतकरी रामचंद्र कदमशेठ यांनी पेरूची लागवड केली आहे. त्यांनी उत्पादित केलेल्या एका पेरूचे वजन अर्धा ते पाऊण किलो इतके आहे. मेहनत करुन उत्पादित केलेल्या पेरुला बाजारपेठ नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत. मुंबईतील वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीचे घाऊक मार्केट बंद झाल्यामुळे अखेर कदम कुटुंबीयांना स्थानिक बाजारपेठेतील ग्राहकांचा शोध घ्यावा लागत आहे. 

बोरावळे ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीतील चाळीचा कोंड येथील सावित्री, ढवळी आणि कामथी या तीन नद्यांच्या त्रिवेणी संगमावर रामचंद्र कदमशेठ यांनी तीन एकर जमिनीवर पेरुची लागवड केली. 2017 मध्ये त्यांनी हा प्रयोग केला. व्हीएनआर जातीची 1500 हून अधिक रोपे त्यांनी लावली.

गतवर्षी पुराचे पाणी कदम यांच्या शेतात घुसले. त्यामुळे काही पेरूची रोपे कुजून वाया गेली. त्यानंतर अनेक रोपांना आधार देत त्यांनी ही रोपे जगवली. तब्बल अडीच ते तीन टनावर पेरू उत्पादनाची त्यांना अपेक्षा असून एका फळाचे वजन तब्बल पाचशे-सहाशे ग्रॅमपासून पाऊण किलो इतके आहे.

कोरोनामुळे महाड, बिरवाडी, पोलादपूर, तुडील, राजेवाडी, माणगांव, लोणेरे या भागात त्यांना स्वतःच्या वाहनाने पेरू पोचवून स्वतःच विक्री करावी लागली. थेट बाजारपेठेतील फळविक्रेत्यांपर्यंत माल पोचवित विक्रीची यंत्रणा त्यांनी राबवली आहे. कामगार नसल्यामुळे कदम कुटुंबाने पेरु विक्रीसाठी स्थानिक बाजारपेठेत पायपीट केली. 

नुकसान टाळण्यासाठी थेट विक्री 
पोलादपूर शहरातील शिवाजीनगर येथील दुकानामध्ये त्यांची मुलगी विमल आणि नातू अतुल या पेरूंची विक्री करतात. शेतकऱ्यांच्या मालाला थेट बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यास संभाव्य नुकसानही टाळता येते, असा प्रयोगही या कदम यांनी यशस्वी केला. यामुळे त्यांनी सर्वच शेतकऱ्यांना आदर्श घालून दिला आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ramchandra Kadam Produce 75 Gram Weight Of One Guava