माजी आमदारांचा भाजपमधून पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश 

मुझफ्फर खान
Wednesday, 30 September 2020

महाराष्ट्रात 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून रमेश कदमही राष्ट्रवादीत सामील झाले

चिपळूण - माजी आमदार रमेश कदम यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. कदमांचा राष्ट्रवादीतून शेकाप, काँग्रेस, भाजप नंतर पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस असा राजकीय प्रवास राहिला आहे. 

महाराष्ट्रात 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून रमेश कदमही राष्ट्रवादीत सामील झाले. माजी खासदार कै. गोविंदराव निकम, राजाभाऊ लिमये यांच्यासह रमेश कदमांनी जिल्ह्याचे नेतृत्व केले. ते उर्वरित वैधानिक विकास महामंडळाचे सदस्य होते. 1999 आणि 2009 च्या निवडणूकीत त्यांचा पराभव झाला होता. 2004 च्या विधानसभा निवडणूकीत ते राष्ट्रवादीच्या चिन्हावर चिपळूणमधून निवडून आले. मात्र 2005 मध्ये माजी मंत्री भास्कर जाधव राष्ट्रवादीत आल्यानंतर पक्षाने कदमांना डावळून पक्षाची मोठी पदे भास्कर जाधवांना दिली. त्यामुळे रमेश कदमांची कोंडी झाली होती. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी शेकापच्या चिन्ह्यावर राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवली होती. शेकापमधून बाहेर पडत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र चिपळूण पालिकेतील भाजपचे लोकप्रतिनिधी आणि महाराष्ट्रातील पदाधिकारी कदमांना विश्‍वासात घेत नाहीत, त्यामुळे कदम अस्वस्थ होते. भाजपमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद मिळवले. मात्र अंतर्गत राजकारणामुळे ते काँग्रेसमध्येही अस्वस्थ होते. ते कोणता पक्ष निवडतील याची सर्वांनाच उत्सुक्ता होती. शिवसेनेतील अनेक नेते रमेश कदमांच्या जवळचे आहेत. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबरोबर त्यांचे संबंध मधूर आहेत. मात्र कदमांकडे असलेले कार्यकर्ते आणि मतदार पाहता त्यांना राष्ट्रवादीत काम करणे सोपे होते. त्यामुळे विधानसभा निवडणूकीदरम्यान ते पुन्हा राष्ट्रवादीत सक्रीय झाले होते. आज त्यांनी पक्षात अधिकृत प्रवेश केला. यावेळी खासदार सुनील तटकरे, चिपळूण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम, पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, दापोलीचे माजी आमदार संजय कदम, प्रदेश युवकचे राकेश चाळके, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष योगेश शिर्के, मंडणगड राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश शिगवण आदी उपस्थित होते. 

हे पण वाचा -  दहशतीचा नवा फंडा : चार-आठ जण जमायचे, गल्ली बोळात घुसायचे  

मी राष्ट्रवादी काँग्रेस सोडली होती, पवार साहेबांना नाही. मी 1974 पासून त्यांच्याबरोबर आहे. ज्यांना पक्षाने सर्वकाही दिले. त्यांनी अडचणीच्या काळात पक्ष सोडला. चिपळूणमधून राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी मी घेतली. पक्षाला दिलेला शब्द पूर्ण केला आणि सन्मानाने पुन्हा पक्षात स्वगृही परतलो. रत्नागिरी जिल्ह्यात हा पक्षच मी स्थापन केला आहे. त्यामुळे नेते देतील ती जबाबदारी पूर्ण करेन. 

-रमेश कदम, माजी आमदार 

हे पण वाचा कोकणात ग्रामीण आरोग्य यंत्रणाही खिळखिळीच

 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ramesh kadam entry in ncp