esakal | रमेश कदम हटाव मोहिमेची मुंबईतून हवा
sakal

बोलून बातमी शोधा

रमेश कदम हटाव मोहिमेची मुंबईतून हवा

चिपळूण - काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रमेश कदम यांना पदावरून हटविण्यासाठी मुंबईतून सूत्रे हलविली जात आहेत. याबाबत कदम यांनी कबुली दिली. योग्य वेळी त्यांची नावे जाहीर करीन, असेही त्यांनी सांगितले. काँग्रेसमध्ये कदम कुणाला नकोसे झाले असल्याचे चित्र आहे. त्यांची पुढची भूमिका काय असेल, याची सर्वांना उत्सुकता आहे.

रमेश कदम हटाव मोहिमेची मुंबईतून हवा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

चिपळूण - काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रमेश कदम यांना पदावरून हटविण्यासाठी मुंबईतून सूत्रे हलविली जात आहेत. याबाबत कदम यांनी कबुली दिली. योग्य वेळी त्यांची नावे जाहीर करीन, असेही त्यांनी सांगितले. काँग्रेसमध्ये कदम कुणाला नकोसे झाले असल्याचे चित्र आहे. त्यांची पुढची भूमिका काय असेल, याची सर्वांना उत्सुकता आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर काँग्रेसमध्ये ब्लेमगेम सुरू झाला आहे. जिल्हाध्यक्षांनी काम केले नाही, असा आरोप काँग्रेसचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांनी केला. बांदिवडेकर यांना समाजाची साडेतीन लाख मते मिळवता आली नाहीत. निवडणुकीसाठी त्यांनी पुरेशी प्रचार यंत्रणा राबवली नाही त्यामुळे बांदिवडेकर यांचा पराभव झाल्याचे रमेश कदमांनी सांगितले. उपाध्यक्ष लियाकत शाह, ॲड. विजय भोसले यांनी मुंबईच्या चिंतन बैठकीत कदमांवर आरोप केले.

मतदान झाल्यानंतर घडलेल्या घडामोडी पाहता जिल्ह्यातील काँग्रेसच्या जुन्या लोकांचा कदमांना विरोध असल्याचे दिसत होते; मात्र कदमांनी माझ्याविरोधी मुंबईतून सूत्रं हलविली जात असल्याचे सांगून अंतर्गत वादाला मुंबईची दिशा दाखवली. मुंबईच्या चिंतन बैठकीला हजर राहून आरोपाला उत्तर देण्याची संधी कदमांकडे होती. परंतु घरगुती कारणामुळे कदम पक्ष निरीक्षकांच्या परवानगीने बैठकीला गैरहजर राहिले. त्यामुळे विरोधकांचा आवाज वाढला. निकालानंतर राज्य पातळीवर पराभवाचे चिंतन सुरू आहे. 

नेतृत्वात बदल करण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र काहीही झाले तरी मला जिल्हाध्यक्षपदावरून हटविणे इतके सोपे नाही, असे रमेश कदमांनी ठणकावून सांगितले ते कोणाच्या बळावर याचाही शोध सुरू झाला आहे.

राणेंपुढे कोकणात काही चालत नव्हते
जिल्ह्यातील काही काँग्रेसचे नेते मुंबईत पक्षाच्या नावावर मोठे झाले. त्यांना कोकणातील संघटनेची सूत्रे आपल्याच हाती हवी असतात. नारायण राणे काँग्रेसमध्ये असताना या नेत्यांचे कोकणात काही चालत नव्हते. त्यामुळे पक्षश्रेष्ठींना हाताशी धरून त्यांनी राणेंचीही कोंडी केली होती. कदम राणेंइतके मोठे नाहीत. राज्यपातळीवर त्यांची कुणाशी स्पर्धा नाही. त्यामुळे कदमच जिल्हाध्यक्षपदी कायम राहतील,असा कार्यकर्त्यांना विश्‍वास आहे. 

काँग्रेसमध्ये आल्यानंतर कदमांनी कार्यकर्त्यांसाठी पदे निर्माण करून सर्वांना काँग्रेसशी जोडून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना पदावरून हटविल्यानंतर काँग्रेस आणखी बॅकफूटवर जाईल.
- फैसल पिलपिले,
शहरप्रमुख युवक काँग्रेस

loading image