पशुपालक, मच्छीमारांसाठी मार्गदर्शन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जानेवारी 2017

रत्नागिरी - धीरुभाई अंबानी यांची ८४ वी जयंती, रिलायन्स फांउडेशनचा वर्धापन दिन यानिमित्त महिला, पशुपालक, मच्छीमार शेतकऱ्यांसाठी ज्ञानगंगा कार्यक्रम भाट्ये येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्रात झाला. या कार्यक्रमासाठी ‘सकाळ’ने माध्यम प्रायोजकत्व दिले होते.

रत्नागिरी - धीरुभाई अंबानी यांची ८४ वी जयंती, रिलायन्स फांउडेशनचा वर्धापन दिन यानिमित्त महिला, पशुपालक, मच्छीमार शेतकऱ्यांसाठी ज्ञानगंगा कार्यक्रम भाट्ये येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्रात झाला. या कार्यक्रमासाठी ‘सकाळ’ने माध्यम प्रायोजकत्व दिले होते.

सुरवातीला रोपटे देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राच्या आवारात रोपट्यांना पाणी देऊन कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि केंद्राचे कृषी विद्यावेत्ता डॉ. वैभव शिंदे यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. यावेळी सहायक मत्स्य आयुक्त नागनाथ भादुले, पशुसंवर्धन विकास अधिकारी डॉ. अभिजित कसालकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सूर्यवंशी, लोकसंचालित सेवा साधन केंद्राच्या व्यवस्थापक योगिता भाटकर, बालविकास प्रकल्पाच्या कल्पना आंबवले, जिओ रिलायन्सचे विनोद तुरंबे, तुषार आग्रे, बॅंक ऑफ इंडियाचे अधिकारी जयप्रकाश तिवारी, स्वयंरोजगार संस्थेचे प्रसाद आग्रे, संतोष सिनकर, ‘सकाळ’चे सहायक व्यवस्थापक (वितरण) राजू चव्हाण, संपादकीय विभागाचे महादेव तुरंबेकर, नारळ संशोधन केंद्राचे अधिकारी उपस्थित होते. 

श्री. सूर्यवंशी यांनी महिलांना गॅसपासून होणाऱ्या आपत्ती, त्यापासून बचाव कसा करावा, आग लागल्यास प्राथमिक काळजी कशी घ्यावी, नैसर्गिक आपत्तीपासून बचाव याची माहिती दिली. रिलायन्स फांउडेशनने वर्षभरामध्ये जिल्ह्यात हजारांहून अधिक महिला, शेतकरी, मच्छीमारांना मार्गदर्शन केले. कोकण विभागात पन्नास हजारपेक्षा जास्त मच्छीमार, महिलांना व्हॉट्‌सॲप, ध्वनी संदेशाद्वारे शेती, पशुपालन व समुद्रातील हवामानाची माहिती पाठवली जाते. जिल्ह्यात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आरोग्यविषयक शिबिरे, महिलांसाठी प्रात्यक्षिक कार्यक्रम, पशुपालकांसाठी लसीकरण, मच्छीमारांसाठी आपत्ती व्यवस्थापन व इतर कार्यक्रम राबवले जातात, अशी माहिती दिली. मत्स्य व्यवसाय सहायक आयुक्त श्री. भादुले यांनीही मार्गदर्शन केले. 

डॉ. शिंदे यांनी मसाले पिकांची लागवड, खत, पाणी व्यवस्थापन, कलम करण्याचे प्रात्यक्षिक दाखवले. कमी खर्चात गांडूळ खतनिर्मितीचे प्रात्यक्षिक दाखवले. नारळाच्या झावळ्यांपासून खत निर्मितीची माहिती देण्यात आली. ओशी येथे रिलायन्स फाउंडेशन व नारळ संशोधन केंद्रातर्फे खतप्रकल्प केला आहे. कार्यक्रमाला तालुक्‍यातील ओशी, कुरतडे, पानवळ, काळबादेवी, नाखरे, हरचेरी, गोळप, डुगवे गावातील १२० महिला, शेतकरी उपस्थित होते.

जिओ मनीद्वारे कॅशलेसचे प्रात्यक्षिक
कॅशलेस व्यवहारासाठी रिलायन्स जिओच्या माध्यमातून ‘जिओ मनी’ कॅशलेस व्यवहाराचे प्रात्यक्षिक या वेळी अधिकारी, महिलांना दाखवण्यात आले. जिओ व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे डॉ. वैभव शिंदे यांनी मावळंगे येथील आंबा, नारळबागायतदारांना आंबा, नारळ पीक संरक्षणासंदर्भात मार्गदर्शन केले. त्यानंतर मोफत जिओ सिम कार्डचे वाटप केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ranchers, fishermen guidance