दौरा मुख्यमंत्र्यांचा; चर्चा राणेंची 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

कणकवली - खासदार नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाबाबतची भूमिका मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेत स्पष्ट करतील, असे भाजप जिल्हाध्यक्षांनी सांगितलंय. तर कणकवलीत येणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे आम्ही स्वागत करू, असे आमदार नीतेश राणेंनी जाहीर केले आहे. या दोन्ही गोष्टींची पूर्तता उद्या (ता. 17) मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेत होणार का? याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे.

कणकवली - खासदार नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाबाबतची भूमिका मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेत स्पष्ट करतील, असे भाजप जिल्हाध्यक्षांनी सांगितलंय. तर कणकवलीत येणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे आम्ही स्वागत करू, असे आमदार नीतेश राणेंनी जाहीर केले आहे. या दोन्ही गोष्टींची पूर्तता उद्या (ता. 17) मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेत होणार का? याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे. तसेच मुख्यमंत्र्यांचा हा दौरा भाजप कार्यकर्त्यांसाठी बूस्टर डोस ठरणार का? असाही प्रश्‍न या यात्रेच्या निमित्ताने उपस्थित होत आहे. 

महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विसर्जित होईल, अशी भूमिका माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांनी गेल्या महिन्यात जाहीर केली होती. त्यानंतर राज्यभरातील अनेक दिग्गज मंडळींनी भाजपमध्ये प्रवेश केला. ही मंडळी मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेतही सहभागी झाली. पण राणेंच्या भाजप प्रवेशाबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे उद्याच्या महाजनादेश यात्रेत राणेंबाबत मुख्यमंत्री काय निर्णय घेतात, याकडे महाराष्ट्र स्वाभिमान कार्यकर्त्यांसह जिल्हावासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. 

2014 मध्ये केंद्रात मोदीपर्व सुरू झाले. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजपने कमालीची बाजी मारली; पण कोकणात पेण मतदारसंघाचा अपवाद वगळता भाजपला कुठेच यश मिळाले नाही. एवढेच नव्हे तर भाजपला आपली कणकवलीची विनिंग सीट गमवावी लागली. या गोष्टीला आता पाच वर्षे पूर्ण होत आहेत; मात्र या पाच वर्षांत सिंधुदुर्गातील राजकीय परिस्थितीत फारसा बदल झाला नसून भाजप अजूनही बॅकफूटवरच राहिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेनंतर सिंधुदुर्गात भाजप खरंच आघाडी घेईल, की राणेंच्या प्रवेशानंतर सिंधुदुर्गातील भाजपवर त्यांचा वरचष्मा राहील, याची चर्चा अनेक भाजप कार्यकर्त्यांमध्ये आहे. याबाबतचे चित्र उद्याच्या दौऱ्यात स्पष्ट होण्याची शक्‍यता आहे. 

भाजपमधील अनेक नेत्यांमध्ये अवस्थता 
आमदार नीतेश राणे यांनी सिंधुदुर्गात येणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे आम्ही स्वागत करणार असल्याची भूमिका दोन दिवसापूर्वी जाहीर केली. राणेंच्या या वक्‍तव्यामुळे कणकवली विधानसभा लढवू पाहणाऱ्या भाजपमधील अनेक नेत्यांमध्ये अवस्थता निर्माण झाली आहे. राणे उद्या खरंच मुख्यमंत्र्यांचे जंगी स्वागत करणार का? तसेच पुढील काळात राणे हेच भाजपचे उमेदवार असतील का, याचीही उत्सुकता भाजप नेत्यांना लागून राहिली आहे. 

बूस्टर डोस ठरणार का? 
राज्यातील भाजपची सत्ता कायम राखण्याचा निर्धार भाजपने केला आहे. याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा राज्यभरात प्रवास करत आहे. ही यात्रा उद्या (ता. 17) सिंधुदुर्गात येत आहे; मात्र मुख्यमंत्र्यांची ही यात्रा भाजप कार्यकर्त्यांसाठी बूस्टर डोस ठरणार का? मुख्यमंत्र्यांचा हा दौरा सिंधुदुर्ग भाजपसाठी फलदायी ठरणार का याचीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rane comes in discussion before Chief Minister Devendra Fadnavis Konkan Tour