दापोली तालुक्यातील कात कारखानदाराकडे मागितली खंडणी 

चंद्रशेखर जोशी
Thursday, 5 November 2020

खंडणीप्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

दाभोळ : रत्नागिरी जिल्ह्यातील टेटवली (ता. दापोली) येथील कात कारखान्याच्या मालकाकडून दीड लाख रुपयांची खंडणी मागितल्याची तक्रार दापोली पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली. गुन्हा दाखल झालेल्या दोन संशयितांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. 

या प्रकरणी दापोली पोलिसांनी दिलेली माहिती अशी : टेटवली येथे विशाल मालवणकर यांच्या पत्नीची काताची कंपनी आहे. मालवणकर 2010 पासून मंडणगड येथील विजय काते यांच्याकडून कच्चा माल घेत होते. 2017 पासून त्यांनी काते यांच्याकडून कच्चा माल घेणे बंद केले. तेव्हापासून विजय हे विशाल यांना धमकी देऊन वारंवार पैशांची मागणी करीत होते. मंगळवारी (ता. 3) सायंकाळी 7.05 ला विशाल यांना त्यांच्या वडिलांनी फोनवर सांगितले, की स्वाती नावाच्या महिलेला विजय काते आपल्या कंपनीच्या प्रवेशद्वारावर सोडून गेला. ती महिला आपल्या कंपनीची छायाचित्रे काढत आहे. तुझ्या आईने महिलेकडे ओळखपत्र मागितले असता आईला ढकलून कंपनीच्या प्रवेशद्वारावर ती उभी आहे. यामुळे विशाल हे टेटवली येथे जात असता वाकवली येथील एटीएमजवळ विजय यांची चारचाकी आढळली. विशाल यांनी आपली गाडी थांबवली. विजय काते गाडीजवळ आले व त्यांनी मला तुझ्याशी बोलायचे आहे, मोबाईल गाडीत ठेवून ये, असे सांगितले. विशाल गेले असता विजय यांनी मला दीड लाख रुपये दे, नाहीतर तुला ठार करीन, पत्रकारांकरवी किंवा महिलांकरवी तुझ्यावर खोट्या तक्रारी दाखल करेन, तुझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करायला लावेन, तुझ्या कंपनीत स्वाती ही पत्रकार पाठविली आहे, असे सांगितले. 

त्यानंतर विशाल कंपनीत गेले असता कंपनीच्या प्रवेशद्वारावर स्वाती नावाची पत्रकार महिला व वन विभागाचे अधिकारी होते. अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता त्यांना कंपनीत काहीही अवैध आढळून न आल्याने ते निघून गेले. महिला तेथे उभी होती. मी त्यांच्याकडे ओळखपत्राची मागणी केली असता त्यांनी मला विजय काते यांनी पाठविले आहे, त्यांची मागणी पूर्ण करा, असे सांगितले, असे विशाल मालवणकर यांनी तक्रारीत म्हटले आहे. दापोली पोलिस ठाण्यात विजय काते व स्वाती वावडेकर (रा. कल्याण) या दोन संशयितांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, हेड कॉन्स्टेबल मंदार हळदे तपास करीत आहेत. 

संपादन : विजय वेदपाठक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ransom demanded from a manufacturer in Dapoli taluka