महिलेवर बलात्कार करून जीवे मारण्याचा प्रयत्न 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जुलै 2019

गुहागर - तालुक्‍यातील दोडवली येथे शेतात काम करणाऱ्या महिलेवर बलात्कार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी (ता. 2) घडली. या घटनेवरून संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.

गुहागर - तालुक्‍यातील दोडवली येथे शेतात काम करणाऱ्या महिलेवर बलात्कार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी (ता. 2) घडली. या घटनेवरून संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. महिनाभरापूर्वी गावातून बेपत्ता झालेली महिला, आज झालेला बलात्कार आणि खुनाचा प्रयत्न या घटनांचा संबंध आहे का, याचाही तपास व्हावा. पाईपलाईनचे काम करणाऱ्या कंत्राटदार व कामगारांची कसून चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 

सोमवारी रात्री दोडवलीतील महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार पीडित महिला (वय 55) सकाळी 9 वाजता शेतात लावणी करण्यासाठी गेली होती. दुपारी 12 च्या सुमारास पाईपलाईनचे काम करणाऱ्या कामगारांपैकी टुनटुन कुमार (मूळ गाव मुझफ्फरनगर, बिहार) हा कामगार तिच्याकडे पाहून अश्‍लील हावभाव करीत होता. त्यामुळे घाबरलेली महिला घराच्या दिशेने पळू लागली. तिचा पाठलाग करून टुनटुन कुमारने तिला पकडले पायवाटेवरील एका झाडीत तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर साडीनेच महिलेचे हात मनगटाजवळ बांधले. तोंड व गळा बांधला. मारहाण केली. त्यामुळे महिलेची शुद्ध हरपली. ती मेल्याचे गृहीत धरून आजूबाजूच्या झाडाच्या फांद्या तोडून तिच्या अंगावर टाकल्या. सावध झाल्यावर सदर महिलेने घर गाठून ही घटना सर्वांना सांगितली. घरच्या मंडळींनी सोमवारी रात्री तिला गुहागरमधील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. गुहागर पोलिसांत संबंधित महिलेने तक्रार दाखल केली. तातडीने तपास करत पोलिसांनी टुनटुन कुमारला अटक केली आहे. 

या घटनेने संतप्त झालेल्या शेकडो ग्रामस्थांनी आज तहसीलदार सौ. लता धोत्रे यांची भेट घेतली. गुन्हेगारांवर कडक कारवाई होईपर्यंत पाईपलाईनचे काम बंद ठेवावे; अन्यथा आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल, असा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला. 

ग्रामस्थांनीच दिले टुनटुन कुमारला ताब्यात 
पीडित महिलेने घरी येऊन घडला प्रकार सांगितल्यावर ग्रामस्थांनी तातडीने परिसरात काम करणाऱ्या सुमारे 9 कामगारांना पकडले. संबंधित महिलेसमोर या सर्वांना उभे केले. त्यावेळी महिलेने टुनटुन कुमारला ओळखले. संतप्त ग्रामस्थ आणि पोलिसांना समोर पाहिल्यावर टुनटुन कुमारने केल्या कृत्याची कबुली दिली.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rape incidence in Guhagar Taluka