esakal | सिंधुदुर्गात येणाऱ्या प्रत्येकाची रॅपिड टेस्ट : उदय सामंत
sakal

बोलून बातमी शोधा

सिंधुदुर्गात येणाऱ्या प्रत्येकाची रॅपिड टेस्ट : उदय सामंत

सिंधुदुर्गात येणाऱ्या प्रत्येकाची रॅपिड टेस्ट : उदय सामंत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कणकवली (सिंधुदुर्ग) : जिल्ह्यात विनाकारण फिरणाऱ्या प्रत्येकाची सध्या रॅपिड अँन्टीजन टेस्ट केली जात आहे. त्याचबरोबर आजपासून सिंधुदुर्गात येणाऱ्या प्रत्येकाची रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. कोविड सेंटरवर तसेच शासकीय रुग्णालयात कोविड रुग्णांना भेटण्यासाठी येणाऱ्या नातेवाइकांचीही टेस्ट केली जाणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिली.

खारेपाटण चेक नाक्‍यावर येणाऱ्या प्रवाशांची फक्‍त तापमान, ऑक्‍सिजन मात्रा इतक्‍याच नोंदी घेतल्या जातात. रॅपिड टेस्ट केली जात नसल्याबाबत येथील पत्रकारांनी पालकमंत्र्यांना प्रश्‍न उपस्थित केला होता. यावेळी सामंत यांनी, चेकनाक्‍यावरून सिंधुदुर्गात येणाऱ्या प्रत्येकाची रॅपिड टेस्ट आजपासून घेतली जात असल्याची माहिती दिली. ज्या ठिकाणी रॅपिड अँटिजन टेस्ट होत नसेल तेथे प्रवाशांची आरटीपीसीआर टेस्ट घेण्याचेही निर्देश सर्व यंत्रणांना दिले आहेत. त्यानुसार कार्यवाही देखील सुरू झाली आहे.

ते म्हणाले, 'जिल्ह्यातील कोविड सेंटर तसेच जिल्हा रुग्णालयातील कोविड कक्षात नातेवाइकांची गर्दी होते. यात कोरोना संसर्गाची शक्‍यता अधिक प्रमाणात राहते. त्यामुळे जिल्ह्यातील कोविड सेंटरवर येणाऱ्या नातेवाइकांचीही कोरोना टेस्ट केली जाणार आहे; मात्र ही कृती रुग्णांच्या नातेवाइकांना त्रास देण्यासाठी नाही तर कोरोना नियंत्रणात यावा, यासाठी आहे. जास्तीत जास्त कोरोना रुग्णांवर तातडीने उपचार करता यावेत यासाठी केले जात आहे.'

मंत्री असूनही आपलीही आरोग्य तपासणी

सिंधुदुर्ग दौऱ्यावर आज कोकण रेल्वेतून आलो. त्यावेळी स्थानकावरील सर्वांना मी मंत्री असल्याचे माहिती होते. तरीही सिंधुदुर्ग स्थानकात मला आरोग्य कर्मचाऱ्यांनी थांबण्यास सांगितले. ऑक्‍सिजन लेव्हल, थर्मल गनने तपासणी केल्यानंतरच मला पुढे जाऊ देण्यात आले. आरोग्य कर्मचाऱ्यांनी पालकमंत्री म्हणून मला वेगळा न्याय लावला नाही. याचा मला अभिमान वाटला, असे पालकमंत्री उदय सामंत म्हणाले.

कोरोना रुग्णांवर गावातच अंत्यसंस्कार

ग्रामीण व्यक्‍तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर तो मृतदेह अंत्यसंस्कारासाठी शहरात आणला जातो. मात्र त्या मृतदेहावर गावातच अंत्यसंस्कार व्हावेत, असे निर्देश सर्व तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत. कोरोनामुळे मृत झालेल्यांचा मृतदेह गावी नेण्यासाठी दोन शववाहिन्या लवकरच उपलब्ध करून देत असल्याचीही ग्वाही श्री. सामंत यांनी दिली.