
प्रतीक मोरे आणि शार्दूल नेहमीप्रमाणे महिमानगडाच्या जंगलात फिरत असताना टॉनी म्हणजेच ब्राऊनिश ऑरेंज कलर आणि बाहेरुन डार्क ब्राउन रंग असलेल्या फुलपाखराने त्यांचे लक्ष वेधून घेतले. सकाळच्या कोवळ्या उन्हात याचा रंग बाजूच्या हिरव्यागार झाडीत उठून दिसत होता.
देवरूख ( रत्नागिरी ) - संगमेश्वर तालुक्यातील कुंडीच्या जवळ महिमानगड परिसरात फिरत असताना निसर्गप्रेमी प्रतीक मोरे आणि त्याच्या मित्राला पश्चिम घाटात आढळणारे आणि दुर्मिळ समजले जाणारे सह्याद्री येवमन प्रजातीचे फुलपाखरू आढळून आले. ज्या फुलपाखराच्या शोधासाठी प्रतीक थेट गोव्यापर्यंत फिरुन आला होता, त्याचे दर्शन संगमेश्वर तालुक्यात झाल्याने प्रतीकने आनंद व्यक्त केला आहे.
प्रतीक मोरे आणि शार्दूल नेहमीप्रमाणे महिमानगडाच्या जंगलात फिरत असताना टॉनी म्हणजेच ब्राऊनिश ऑरेंज कलर आणि बाहेरुन डार्क ब्राउन रंग असलेल्या फुलपाखराने त्यांचे लक्ष वेधून घेतले. सकाळच्या कोवळ्या उन्हात याचा रंग बाजूच्या हिरव्यागार झाडीत उठून दिसत होता. नुकताच या फुलपाखरासाठी प्रतीक गोवा राज्यात बोंडला नॅशनल पार्कमध्ये जाऊन आला असल्याने याची ओळख त्याला चटकन पटली. आतापर्यंत याचा आढळ महाराष्ट्रात अंबोलीपर्यंतच मिळाला होता. आता देवरूख परिसरात याच्या अस्तित्वाचा पुरावा मिळण ही निसर्गप्रेमींसाठी अत्यंत आनंदाची पर्वणी असून आपले सह्याद्रीचे खोरे किती जैवविविधतेने नटलेले आहे, याची साक्ष असल्याचे प्रतीकने सांगितले.
आपल्या देशात ज्या पाच राज्यांनी आपली राज्य फुलपाखरे घोषित केली आहेत त्यापैकी तमिळनाडू राज्याचे हे राज्य फुलपाखरू. तमिळ संस्कृतीमध्ये या फुलपाखराला अनन्यसाधारण महत्व असून त्याला मर्वन म्हणजेच तमिळी योद्धा असे संबोधले जाते. देशभरात फक्त पश्चिम घाटातच मिळणाऱ्या ३२ एंडेमिक जातींमध्ये याचा समावेश होतो. यावरून याची दुर्मिळता लक्षात येते.
अधिवासाचे संरक्षण ही काळाची गरज
एकाहून एक दुर्मिळ वैविध्याने नटलेला हा सह्याद्री आज अवैध जंगलतोड आणि शिकारीच्या दुष्टचक्रात सापडला आहे. यातून या अधिवासाचे संरक्षण होणे ही आज काळाची गरज आहे.
- प्रतीक मोरे, संगमेश्वर