esakal | हापूस पेटीच्या दरात घट; फळ बाजारातीलआवक वाढली
sakal

बोलून बातमी शोधा

हापूस पेटीच्या दरात घट; फळ बाजारातीलआवक वाढली

हापूस पेटीच्या दरात घट; फळ बाजारातीलआवक वाढली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : उन्हाच्या कडाक्‍यामुळे दुसऱ्या टप्प्यातील आंबा वेगाने तयार होत आहे. गेल्या चार दिवसात नवी मुंबईतील फळ बाजारातील हापूसची आवक वाढली आहे. त्याचा परिणाम दरावर झाला आहे. दर पाचशे रुपयांनी घसरले आहेत. सध्या पेटीचा दर 1500 ते 4 हजार रुपयांपर्यंत आहेत; मात्र संचारबंदीमुळे ग्राहकांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. वातावरणातील अनियमिततेमुळे पहिल्या टप्प्यातील हापूसच्या उत्पादनावर परिणाम झाला होता. मागील पंधरा दिवस आंबाच नसल्यामुळे ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागत होती. गुढीपाडव्यापूर्वी वाशीमध्ये 18 ते 20 हजार पेटी जात होती.

पाडव्याला मुहूर्ताच्या दिवशी 34 हजार सर्वाधिक पेटी गेली. त्यानंतर पुन्हा परिस्थिती जैसे थे च होती. एप्रिल महिन्यात रत्नागिरी, सिंधुदुर्गमधून सरासरी 60 हजार पेटी जाते. त्यामुळे दर वधारले असून चार दिवसांपूर्वी हे दर पाच डझनच्या पेटीला दोन हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत होते. सध्या दुसऱ्या टप्प्यातील आंबा तयार होण्यास सुरवात झाली आहे. गेल्या तीन दिवसात 30 हजार ते 34 हजार पेटी आंबा रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून वाशीत दाखल होत आहे. उत्पादन कमी असल्यामुळे यंदा एप्रिल महिन्यातील दर विक्रमी होते; मात्र वाढलेली आवक आणि संचारबंदीमुळे ग्राहकांकडून मिळत असलेला अल्प प्रतिसाद याचा परिणाम दरावर झालेला आहे. आठ दिवसात पाचशे रुपयांनी दर खाली आले आहेत. संचारबंदीचा कालावधी 30 एप्रिलपर्यंत असून कडक निर्बंधांमुळे वाहतुकीत अडचणी निर्माण होण्याची भीती बागायतदार व्यक्‍त करत आहेत.

अमेरिकेत निर्यात अशक्‍य

दर कमी आल्यामुळे निर्यातही सुरू झाली आहे. गल्फ, युरोप खंडात गेल्या महिन्यात वीस टक्‍केच आंबा जात होता. त्यात आता दहा टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. विमानाने वाहतूक करताना निर्यातदारांना दुप्पट किंमत मोजावी लागत आहे. तसेच कोरोनातील परिस्थितीमुळे यंदा अमेरिकेत आंबा जाणे अशक्‍य आहे. तेथील निरीक्षक तपासणीसाठी येऊ न शकल्याने निर्यात अशक्‍य आहे.

"हापूसची आवक कमी असून ग्राहकांकडून मागणी वाढली आहे. संचारबंदीचा परिणाम मागणीवर होत आहे. त्यामुळे दर कमी होणार आहेत; परंतु यंदा एप्रिल महिन्यात दर चढे राहिल्याचा फायदा बागायतदारांना होऊ शकतो."

- संजय पानसरे, संचालक, बाजार समिती नवी मुंबई

दृष्टिक्षेपात..

  • रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून हापूस रवाना

  • तीन दिवसात 30 हजार ते 34 हजार पेटी वाशित

  • आठ दिवसात पाचशे रुपयांनी दर आले खाली

  • कडक निर्बंधांमुळे वाहतुकीत अडचणी शक्‍य

  • गल्फ, युरोप खंडात वीस टक्‍केच; आता 10 टक्के वाढ

  • कोरोना परिस्थितीमुळे यंदा अमेरिकेत आंबा जाणे अशक्‍य