esakal | सिंधुदुर्गात 1 मेपासून रेशन दुकाने बंद

बोलून बातमी शोधा

सिंधुदुर्गात 1 मेपासून रेशन दुकाने बंद
सिंधुदुर्गात 1 मेपासून रेशन दुकाने बंद
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कणकवली (सिंधुदुर्ग) : कोरोना काळातही धान्य वितरण करताना शासनाने रेशनकार्ड धारकाला ई - पास मशिनवर थम लावणे बंधनकारक केले आहे; मात्र या प्रक्रियेत रेशन दुकान व्यावसायिकांना कोरोना संसर्गाचा मोठा धोका आहे. त्यामुळे 1 मेपासून जिल्ह्यातील सर्व रास्त धान्य दुकाने बंद ठेवली जाणार आहेत. जर शासनाने थम लावण्याची अट रद्द केली तरच आम्ही संप मागे घेऊ, अशी भूमिका रास्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रूपेश पेडणेकर यांनी स्पष्ट केली.

जिल्हा व शहर रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेची बैठक ओरोस येथील जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्यासमवेत झाली. या बैठकीत पुरवठा अधिकाऱ्यांनी संप मागे घेण्याचे आवाहन केले होते; मात्र जोपर्यंत शासनाकडून प्रत्येक नागरिकाला कोरोना काळात रास्त धान्य दुकानावर येऊन थम लावण्याची अट रद्द करत नाही, तोपर्यंत हा संप मागे घेण्यात येणार नसल्याची भूमिका आम्ही मांडल्याचे जिल्हाध्यक्ष पेडणेकर म्हणाले.

पुरवठा अधिकारी यांच्या समवेत झालेल्या बैठकीमध्ये रास्त धान्य दुकानदार संघटनेचे सल्लागार रमाकांत तथा बाळू कुबल, कणकवली तालुका उपाध्यक्ष बाबू नारकर, मालवण तालुका अध्यक्ष सुनील मलये, जिल्हा उपाध्यक्ष कानोबा देसाई, वेंगुर्ले अध्यक्ष तात्या हाडये, बबन लोकरे, संजय मुळीक, प्रकाश बांदेकर, राजीव पाटकर, विजय सावंत, पांडुरंग पालव आदी उपस्थित होते.

बैठकीनंतर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यात संपूर्ण राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आहे. जिल्ह्यातही तशीच परिस्थिती आहे. त्यामुळे ई-पास मशीनवर कार्डधारकांची थम न घेता धान्य दुकानदारांच्या थमने धान्य वाटपास परवानगी द्यावी, अशी प्रमुख मागणी केली आहे. याखेरीज राज्यातील 55 हजार स्वस्त धान्य दुकानदार कोविड या महामार्गाच्या काळात शासनाकडून कोणत्याही प्रकारचे विमा कवच नसल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या परवानाधारकांना कोणतीही आर्थिक मदत मिळत नाही. राज्यात कोरोना महामारीच्या काळात भूकबळी होऊ नये म्हणून अविरतपणे आपल्या जिवाची पर्वा न करता आम्ही धान्य वाटप केलेले आहे. तरीही शासनाने आमच्या मागण्यांना प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे 1 मेपासून सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना धान्य वितरण व वाटप बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे.

"" रेशन दुकानावर दिवसातून शेकडो कार्डधारक येतात. त्या सर्वांचा अंगठा ई - पास मशिनवर उमटवावा लागतो. अनेकवेळा कार्ड धारकांच्या अंगठ्याचा थम जुळत नसल्यास इतर बोटांचा थम घेतला जातो. या प्रक्रियेत कार्डधारक आणि दुकान व्यावसायिकांचा निकटचा संपर्क येतो. यात कोरोना संसर्गाचा धोका वाढतो. सोनाळी (ता. वैभववाडी) गावातील रास्त भाव धान्य दुकानदार भिकाजी पवार यांचे कोरोनामुळे निधन झाले. या पार्श्‍वभूमीवर अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक संघटनेने पुकारलेल्या 1 मे पासून रास्त दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ''

- रूपेश पेडणेकर, जिल्हाध्यक्ष रास्त धान्य दुकानदार संघटना

Edited By- Archana Banage