रत्नागिरी जिल्ह्यात जानेवारीपासून हवाई सफर

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 27 August 2020

रत्नागिरीतील पर्यटनाला चालना देण्यासाठी रत्नागिरी, सिंधुदुर्गतील विमानतळे लवकरच वाहतुकीसाठी सुरु केली जाणार आहेत.

रत्नागिरी : रत्नागिरीतील पर्यटनाला चालना देण्यासाठी रत्नागिरी, सिंधुदुर्गतील विमानतळे लवकरच वाहतुकीसाठी सुरु केली जाणार आहेत. कोरोनामुळे सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळाचे काम रखडले होते. तर रत्नागिरी विमानतळाबाबत तटरक्षक दलाशी चर्चा सुरु असून जानेवारीत हवाई उड्डाण होईल असा विश्‍वास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.

झुम अ‍ॅपवरुन मंत्री सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. सध्या कोविडीमुळे रेल्वे वाहतूक बंद आहे. रत्नागिरीतील विमानतळाच्या धावपट्टीचे काम पूर्ण झाले असून ती कोस्टगार्डकडे आहे. उडान योजनेतंर्गत रत्नागिरीचा समावेश केलेला आहे. येथील टर्मिनल इमारतीचेही काम सुरु झाले आहे. येथील हवाई वाहतूक सुरु करण्यासंदर्भात जानेवारीमध्ये निर्णय होईल. तसेच सिंधुदुर्गच्या चिपी विमानतळ डिसेंबरपर्यंत सुरु केले जाईल. 

हेही वाचा - एसटीच्या देखाव्यातून केले समाजप्रबोधन; वाचा सविस्तर...

कोविडमुळे 1 मे चा मुहूर्त पुढे गेला आहे. सागरी महामार्ग अस्तित्वात यावा यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरींना विनंती केली होती. त्यानुसार सागरी महामार्गासाठी आवश्यक केंद्राचा समभाग दिला जाईल असे गडकरी यांनी सांगितले आहे. त्यामुळे हा प्रकल्पही मार्गी लागेल. रत्नागिरीतील स्टरलाईटची सातशे एकर जागा पडून आहे. त्यात तांत्रिक अडचणी असून स्टरलाईट कंपनी ही जागा शासनाच्या ताब्यात द्यायला तयार नाही. चौदा लाखाचा महसूल कंपनी भरत आहे. यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल असून उद्योग विभागाकडून चांगला वकील दिला आहे. त्याचा निकाल शासनाच्या बाजूने लागला तर ती जागा कारखाना आणण्यासाठी उपयुक्त ठरेल, असे सांमत यांनी सांगितले. 

ते म्हणाले, महावितरणच्या विजबिलात सवलत दिली जात नसल्यामुळे छोटे उद्योग बंद पडत आहेत. यासंदर्भात मंत्री नितीन राऊत यांच्याकडे चर्चा झाली आहे. कोरोना काळात सरासरी युनिटवर बिले काढली आहेत. त्यात सवलत द्यावी यादृष्टीने मुख्यमंत्री विचार करत आहेत. 

हेही वाचा - कोकणात माहीची हुशारी; काही तासातच लावला छडा..

रोप वेचा प्रस्ताव

जिल्ह्यात तिन रोप वे तयार करण्यात येणार आहे. त्यात राजापूरात माचाळ ते विशाळगड, रत्नागिरीत भगवती आणि थिबापॅलेस ते भाट्ये, चिपळूणात परशुराम मंदिर यांचा समावेश आहे. हा प्रकल्प शासनाला शक्य नसल्याने पीपीपी मॉडेलद्वारे राबविण्याचा विचार आहे. मात्र त्यासाठी कालावधी लागेल. तांत्रिक अभ्यास केल्यानंतर अपघात होणार नाही याची दक्षता घेऊन तीनपैकी एका ठिकाणी पायलट प्रकल्प उभारला जाईल असे सामंत यांनी सांगितले.

संपादन - स्नेहल कदम


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ratnagiri airport start from janevari month uday samant says to reportres in ratnagiri