
रत्नागिरी : मासेमारीला ऑगस्टपासून मुहूर्त
रत्नागिरी : शासनाच्या निर्देशाप्रमाणे १ ऑगस्टपासून मासेमारी बंदी कालावधीत संपुष्टात येत असल्यामुळे पर्ससिननेट वगळता ट्रॉलिंग, गिलनेटसह फिशिंगच्या नौका समुद्रावर स्वार होण्यास सज्ज झाल्या आहेत. पावसाने विश्रांती घेतली असून मासेमारीला पोषक वातावरण आहे. रत्नागिरी जिल्ह्यात तीन हजारहून अधिक नौकांना मासेमारीसाठी जाता येणार आहे.
मत्स्यव्यवसाय विभागाकडून प्राप्त निर्देशांनुसार १ जून ते ३१ जुलै या कालावधीत मासेमारी बंदी केली जाते. ६० दिवसांच्या बंदीनंतर मासेमारी पुन्हा १ ऑगस्टपासून समुद्रावर स्वार होणार आहेत. गेल्या काही वर्षांपासून मासेमारीच्या आरंभच्या काळात समुद्रात चक्रीवादळ तसेच प्रतिकूल हवामान असल्याने मासेमारी हंगामाला विलंबाने सुरुवात झाली होती; मात्र यंदा मासेमारीसाठी वातावरण अनुकूल आहे. गेले आठ दिवस पावसाचा जोर ओसरलेला आहे. हवामान विभागाकडून हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. किनारी भागात हलका वारा असून समुद्रात पाण्याला करंट आहे. बंदी कालावधी संपुष्टात आल्यानंतर ट्रॉलिंग मच्छीमारी नौका मासेमारीला जाऊ शकतात. हंगामाच्या आरंभीला बांगडा, चिंगळं यासारखी मासळी सापडत असल्यामुळे याचा फायदा उठवण्यासाठी मच्छीमार दरवर्षी तयार असतात.
मच्छीमार व्यावसायिक बेजार
शासनाने नव्याने निर्देशित केलेल्या आदेशानुसार, जिल्ह्यातील १२० अश्वशक्तीपेक्षा अधिक क्षमतेच्या नौकांना इंधनातील सवलत (अनुदान) मिळणार नसल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे मच्छीमारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. गेल्या काही वर्षांपासून मासेमारी बोटीला लागणारे इंधन, इंजिन ऑइल, मासेमारी जाळी, एचडीपीई दोर, बोये, इत्यादी साहित्य सातत्याने महाग झाले आहे. या महागाईमुळे तसेच गेल्या काही हंगामांपासून योग्य प्रमाणात मासेमारीदरम्यान माशांची मिळकत होत नसल्याने मच्छीमार व्यावसायिक बेजार झाले आहेत.
छोटी-मोठी २७ बंदरे
दापोली, गुहागर, रत्नागिरी, राजापूर, मंडणगड या तालुक्यात छोटी-मोठी २७ मासेमारी बंदरे आहेत. त्या ठिकाणी मासळी उतरवणे किंवा नौका उभ्या करून ठेवण्याची सुविधा आहे. बंदी कालावधीत बोटीच्या इंजिनाची देखभाल दुरुस्ती व डागडुजी, बोटीची रंगरंगोटी यांसह जाळ्यांची दुरुस्ती व नवीन जाळ्यांची खरेदी मच्छीमारांकडून करण्यात आली आहे.
पर्ससिननेट वगळता अन्य मच्छीमारांना समुद्रात मासेमारीसाठी १ ऑगस्टनंतर जाता येणार आहे. नियमांचे पालन करण्यासाठी मत्स्य विभागाकडून लक्ष ठेवण्यात येत आहे.
- एन. व्ही. भादुले, सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय
मासेमारीसाठी वातावरण चांगले आहे; मात्र श्रावण महिना सुरू असल्यामुळे काही मच्छीमार उशिराने मासेमारीला
आरंभ करतात.- श्रीदत्त भुते, मच्छी
Web Title: Ratnagiri August Season Fishing
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..