रत्नागिरी भाजपने असा साजरा केला वर्धापनदिन 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 एप्रिल 2020

ऍड. पटवर्धन यांनी सांगितले, 1980 साली 6 एप्रिलला भाजपची स्थापना झाली. वर्धापनदिनाचे औचित्य साधून कोरोनाविरुद्धच्या लढ्यात शासनासह भाजपही जनतेसाठी झटत आहे.

रत्नागिरी - भाजपच्या 40 वा वर्धापनदिन सेवा दिन म्हणून साजरा करण्यात आला. रत्नागिरीसह राजापूर, लांजा, देवरुख, संगमेश्‍वर या दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यात शिधावाटप, सकाळी न्याहरी वाटप असे सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. कोरोना (कोव्हिड-19) या जागतिक संकटामध्येही भाजपने समाजाची सेवा करत वर्धापनदिन साजरा केला. 

सकाळी जिल्हाध्यक्ष ऍड. दीपक पटवर्धन यांनी साळवी स्टॉप येथील झोपडपट्टीतील गरजूंना शिधावाटप केले. नंतर कर्तव्यावर असणाऱ्या पोलिस कर्मचारी आणि शहर पोलिसांना नॅपकिन आणि ग्लुकोज डीच्या पाकिटाचे वितरण केले. कोरोनाच्या संकटात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानुसार "पंतप्रधान केअर फंड'साठी योगदान देण्याचे आवाहन ऍड. पटवर्धन यांनी कार्यकर्त्यांना केले. 

यावेळी ऍड. पटवर्धन यांनी सांगितले, 1980 साली 6 एप्रिलला भाजपची स्थापना झाली. वर्धापनदिनाचे औचित्य साधून कोरोनाविरुद्धच्या लढ्यात शासनासह भाजपही जनतेसाठी झटत आहे. गरजूना अन्न पुरवठा, शिधा वाटप, रक्तदान, प्रशासनाबरोबर समन्वय या कामात भाजपचे हजारो कार्यकर्ते पदाधिकारी, लोकप्रतिनिधी कार्यरत आहेत. 538 मंडलात हे सेवा कार्य सुरू आहे. आज सर्व तालुका अध्यक्ष, नगरसेवक या सेवाकार्यात सहभागी झाले.

जिल्हाध्यक्ष पटवर्धन यांनी 200 जणांना भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. तसेच सेवा कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रत्नागिरीत आजपर्यंत दोन हजार घरांपर्यंत शिधा वाटप आणि आठ हजार लोकांना मास्क वाटप केले. शिधा, मास्क, अन्न पुरवठा या गोष्टीही भाजपचे कार्यकर्ते गरजूपर्यंत पोचवत आहेत. 

दररोज नाश्‍ता वाटप 

वर्धापनदिनाचे औचित्य साधून आजपासून जिल्हा शासकीय रुग्णालयात सकाळी 100 प्लेट नाश्‍ता देण्यात आला. हा उपक्रम सलग 8 दिवस राबवण्यात येणार आहे. याकरिता ज्येष्ठ पदाधिकारी राजन फाळके यांनी जबाबदारी स्वीकारली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ratnagiri BJP Celebrates Anniversary As Service Day