esakal | रत्नागिरी भाजपचा जुना-जाणता गट प्रवाहाबाहेर 
sakal

बोलून बातमी शोधा

Ratnagiri BJP Old Group Out Of Stream

कोकणावरील शिवसेनेचा प्रभाव कमी करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. भाजपचे प्रदेश सरचिटणीस आणि माजी मंत्री रवींद्र चव्हाण त्यासाठी गळ टाकून आहेत. पक्षबांधणीसाठी त्यांचे रत्नागिरी दौरे वाढले; मात्र या धावपळीत भाजपला अंतर्गत गटबाजीचा विसर पडला आहे.

रत्नागिरी भाजपचा जुना-जाणता गट प्रवाहाबाहेर 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - जिल्ह्यात मर्यादित ताकद राहिलेल्या भाजपने मरगळ झटकत पक्षबांधणीसाठी जोरदार धडपड सुरू केली आहे. शिवसेनेच्या नाराजांना जाळ्यात ओढण्याचा त्यांचा पहिला प्रयत्न फसला; मात्र दुसऱ्याचे वाकून बघणाऱ्या भाजपने झाकून ठेवण्याचा किती प्रयत्न केला तरी ते उघडे पडले आहे. ग्रामीण भागात चांगला संपर्क असलेला भाजपचा जुना-जाणता एक गट पक्ष प्रवाहाच्याबाहेर आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी त्यांच्याशी जुळवून न घेतल्यास भाजपला गटातटाचे राजकारण महागात पडणार आहे. 

कोकणावरील शिवसेनेचा प्रभाव कमी करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. भाजपचे प्रदेश सरचिटणीस आणि माजी मंत्री रवींद्र चव्हाण त्यासाठी गळ टाकून आहेत. पक्षबांधणीसाठी त्यांचे रत्नागिरी दौरे वाढले; मात्र या धावपळीत भाजपला अंतर्गत गटबाजीचा विसर पडला आहे. शहरासह ग्रामीण भागात चांगला जनसंपर्क असलेला एक गट भाजपच्या या प्रवाहाच्याबाहेर आहे. यामध्ये माजी आमदार बाळ माने, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सतीश शेवडे, नाना शिंदे, अशोक मयेकर, दत्ता देसाई, सुशांत पारकर ही जुनी-जाणती फळी कुठे दिसत नाही.

ग्रामपंचायत निवडणुका तोंडावरच आहेत. तालुक्‍यातील ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे प्राबल्य आहे. 80 ते 90 टक्के ग्रामपंचायती सेनेकडे आहेत तर 10 ते 20 टक्के भाजपकडे आहेत. यामध्ये प्रवाहाच्या बाहेर असलेल्या या गटाचा मोठा वाटा आहे. त्यामुळे भाजपची एक मोट बांधताना दुर्लक्षित असलेल्या या गटाला भाजपला सोबत घेऊन जाणे काळाची गरज बनली आहे. गटातटाचे राजकारण शमविण्यास भाजपला यश आले नाही तर भाजपला निवडणुकांमध्ये फटका बसणार यात शंकाच नाही. यापैकी काहींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो होऊ शकला नाही. 

तुम्हीच त्यांना विचारा 
रत्नागिरी तालुकाध्यक्षपदाच्या निवडीवरून यापूर्वीच या दोन्ही गटातील मतभेद उघड झाले होते. त्यानंतर बाळ माने गटाने स्वतंत्र बैठक घेऊन शक्ती प्रदर्शन केले होते. तेव्हापासून माने गट रवींद्र चव्हाण यांच्या कोणत्याच बैठकीली किंवा त्यांच्या दौऱ्यात दिसत नाही. त्यामुळे ही गटबाजी उघड दिसत आहे. चव्हाण एका पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले होते की माने नाराज नाहीत, तसे असेल तर तुम्हीच त्यांना विचारा.