रत्नागिरी बस कंडक्टर आत्महत्या प्रकरणाला धक्कादायक वळण, कुटुंबीयांनी केले गंभीर आरोप

सकाळ वृत्तसेवा
Monday, 9 November 2020

रत्नागिरी पोलिसांकडे तक्रारही करणार असल्याचे गडदे कुटुंबीयांनी सांगितले आहे

रत्नागिरी- येथील माळनाका एसटी कॉलनीच्या मागील बाजूला असलेल्या चाळीत एसटी कर्मचाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना काल उघडकीस आली होती. या आत्महत्या प्रकरणाला आता वेगळे मिळाले आहे. गडदे यांनी आत्महत्या केली नसून त्यांची हत्याच आहे, असा दावा गडदे यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. पांडुरंग गडदे यांच्या शरीरावर अनेक जखमा दिसून आल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.

गडदे यांचा मृतदेह खोलीमध्ये आढळून आला होता. परंतु, आपल्या भावाने आत्महत्या केलेली नसून त्यांचा घातपात झाला असल्याचा दावा मृत पांडुरंग गडदे यांच्या भाऊ शंकर गडदेने यांनी केला आहे. गडदे यांच्या या दाव्यामुळे आता आत्महत्या प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी प्राथमिक दृष्ट्या ही आत्महत्या असल्याचे म्हटले होते. परंतु, गडदे यांच्या नातेवाईकांनी मृतदेहाची पाहणी केली असता आणि पोलिसांकडील फोटो पाहिले असता पांडुरंग याची आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा केला आहे. 

 पांडुरंग यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या दाव्यानुसार गडदे यांच्या शरिरावर अनेक जखमा आढळून आल्या आहेत. शिवाय मृत्यूवेळी जमिनीला पाय टेकलेल्या आणि निवर्स्त्र अवस्थेत दाराच्या चौकटीला फास लावलेल्या स्थितीत त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे याबाबत  रत्नागिरी पोलिसांकडे तक्रारही करणार असल्याचे गडदे कुटुंबीयांनी सांगितले आहे.

 काय आहे प्रकरण?

रत्नागिरीत माळनाका एसटी कॉलनीच्या मागील बाजूला असलेल्या चाळीत एसटी कर्मचाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली. रत्नागिरी एसटी विभागात वाहक-चालक म्हणून कार्यरत असलेले पांडुरंग संभाजीराव गडदे (वय ३७, मूळ रा. बीड) हे एसटी कॉलनीच्या मागील बाजूला असलेल्या चाळीत भाड्याने राहात होते. रविवारी सकाळपासून ते घराबाहेर पडले नव्हते. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृतदेह शेजाऱ्यांनी पाहिला. त्यानंतर शहर पोलिसांना पाचारण करण्यात आले.

हे पण वाचाविधानसभेला शिवसेनेत जा, हा फडणवीसांचा सल्ला मानला नाही, याचे फळ देशमुखांना आज मिळाले

पोलिसांनी दरवाजा उघडून आत प्रवेश केल्यानंतर पांडुरंग गडदे यांचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला, मात्र मृतदेहाच्या अंगावर कपडे नसल्यामुळे पांडुरंग गडदे यांच्या सहकाऱ्यांनी संशय व्यक्त केला आहे. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणला. शवविच्छेदन केल्यानंतरच पांडुरंग यांचा मृत्यू नेमका कशाने झाला, हे स्पष्ट होणार आहे. पांडुरंग गडदे कपडे काढून का आत्महत्या करतील, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

 

संपादन- धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ratnagiri bus conductor pandurang gadde suicide case serious allegations