रत्नागिरी; मावळंगेतील मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट

Ratnagiri The cause of death in Mavalange is still unclear
Ratnagiri The cause of death in Mavalange is still unclear

पावस - रत्नागिरी तालुक्यातील मावळंगे थूलवाडी येथील दोघांचा रक्ताच्या उलट्या होऊन मृत्यू झालेल्यांचा शवविच्छेदन अहवाल अद्याप आला नसल्याने त्यांना कोणता संसर्ग झाला आहे ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र त्यांच्यासोबत भातकापणीसाठी गेलेल्या 14 जणांची शासकीय रुग्णालयात तपासणी केल्यानंतर एका महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्या घरातील आठ जणांची तपासणी करण्यात येणार असून त्यांचे विलगीकरण करण्यात आले आहे.

या घटनेनंतर आज जिल्हा आरोग्य अधिकारी बबिता कमलापूकर आणि तालुका वैद्यकीय अधिकारी इंगळे यांनी मावळंगे येथे जाऊन पाहणी केली. हा प्रकार घडलेल्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांची तपासणीही केली. मृत तरुणाच्या शवविच्छेदनाचा अहवाल आल्याशिवाय नेमके कारण समजणे कठीण असल्याचे त्यांनी सांगितले.

मावळंगे-थूलवाडी येथील महिला व पुरुष गावखडी येथे भात कापणीसाठी गेले होते. त्यातील एका तरुणाला रक्ताच्या उलट्या झाल्या. नाकातोंडातून रक्त येऊन त्याचा मृत्यू झाला. त्याचे शवविच्छेदन करण्यात आले नाही. त्याच वाडीतील एक महिला चार-पाच दिवस आजारी होती. तिच्यावर खासगी डॉक्टरांकडे औषधोपचार सुरू होते. रात्री अचानक नाकातोंडातून रक्त येऊन तिचा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. आज सायंकाळपर्यंत सवविच्छेदनाचा अहवाल न आल्यामुळे महिलेच्या मृत्यूचे नेमके कारण समजले नाही. मृतांच्या संपर्कात आलेल्या 14 जणांना शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यांची चाचणी करण्यात आली. त्यामध्ये 13 जणांचे अहवाल सर्व चाचण्यांमध्ये निगेटिव्ह आले. मात्र एका महिलेची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. तिला पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच तिच्या संपर्कातील घरातील आठ जणांना विलगीकरण करण्यात आले आहे. त्यांची कोवीड चाचणी केली जाणार आहे.


परिसरात भीतीचे वातावरण

पावस परिसरात 17 ऑक्टोबरपर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या एकशे तीस होती. त्यातील आठ जणांचा मृत्यू वगळता 122 जण उपचार करून घरी परतले. आठ दिवसांपूर्वी मावळंगे येथे एक रुग्ण सापडला. त्याच्यावर उपचार सुरू असताना मावळंगे थूलवाडी येथील मृतांच्या संपर्कातील एक महिला पॉझिटिव्ह आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

मावळंगे- थूलवाडी येथील महिलेचा शवविच्छेदन अहवाल अजून प्राप्त झालेला नाही. त्या अहवालावरच नेमका मृत्यू कशाने झाला ते स्पष्ट होईल.

-डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा शल्यचिकित्सक, रत्नागिरी

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com