esakal | Ratnagiri : बालकाश्रमातील मुले रमली गणेशोत्सवात
sakal

बोलून बातमी शोधा

Ratnagiri : बालकाश्रमातील मुले रमली गणेशोत्सवात

Ratnagiri : बालकाश्रमातील मुले रमली गणेशोत्सवात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

राजापूर : अनेकांचे आई-वडिलांचे छत्र लहानपणीच हरवलेलं, काहींच्या पालकांना विविध व्याधींनी ग्रासलेले त्यामुळे घरची आर्थिक स्थिती बेताचीच, अशा विविधांगी कारणांनी अनाथ, निराधार झालेली मुले तालुक्यातील ओणी येथील वात्सल्य मंदिराच्या बालकाश्रमामध्ये गेल्या ३५ वर्षांहून अधिक काळ मोठ्या भक्तीभावाने गणेशोत्सव साजरा करीत आहेत. दुःखहर्त्या गणरायाकडे आयुष्याभराचे निराधारपण दूर करण्याची मनोकामना करणाऱ्या या मुलांच्या चेहऱ्यावर पारंपरिक रितीरिवाज आणि प्रथेप्रमाणे गणेशोत्सव साजरा करताना दिसणारा आनंद साऱ्यांनाच दुःख विसरायची आणि पचवायची नवी उर्मी मिळवून देणारा असतो.

जग काय असते, याचे भान येण्यापूर्वीच विविध कारणांमुळे अनेकांचे आई-वडिलांचे छत्र हरपते. त्यातच अनेकांच्या पालकांना दुर्धर व्याधींनी ग्रासलेले असते. अशा अनाथ मुलांची तालुक्यातील ओणी येथील वात्सल्य मंदिर ही संस्था बालकाश्रमाच्या माध्यमातून आधारवड बनलेली आहे. देवरूख येथील मातृमंदिर संस्थेची ओणीची ही शाखा वात्सल्य मंदिरकडे सोपवली आहे.

पारंपरिक पद्धतीने सर्व प्रथांचे पालन करून साजऱ्या केल्या जात असलेल्या या गणेशोत्सवामध्ये गोकूळ या बालकाश्रमातील आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून, विविध स्थिती-जाती-धर्मातून आलेली सर्व मुले मोठ्या आनंदामध्ये सहभागी झालेली आहेत. नित्यनेमाने बाप्पांच्या आराधनेत लीन होताना मनोभावे आरत्या करताना त्यामध्येही तल्लीन होतात. गोकूळ आश्रमामध्ये लहानाचे मोठे झालेले माजी विद्यार्थीही या कालावधीमध्ये घरी परतल्याच्या आनंदामध्ये येऊन त्यामध्ये सहभागी झाली आहेत.. डॉ. महेंद्र मोहन, आशा गुजर, अलोक गुजर, सुवर्णा राघव आदींच्या मार्गदर्शनाखाली हा गणेशोत्सव साजरा केला जातो.

loading image
go to top