Ratnagiri Dam Mishap : क्षणार्धात होत्याचे नव्हते...

सुधाकर काशीद 
गुरुवार, 4 जुलै 2019

धरणामुळे गावाला प्यायला पाणी मिळाले. आसपासचा परिसर सिंचनाखाली आला. पण, धरणाच्या डाव्या कोपऱ्यात गेल्या काही वर्षांपासून पाणी झिरपू लागले होते. पावसाळ्यात या झिरपलेल्या पाण्याचा प्रवाह वाढायचा. गावकऱ्यांनी पाटबंधारे विभागाचे अभियंता जोकर त्यांच्यापुढे धरणाच्या डाव्या बाजूने झिरपणाऱ्या पाण्याचे गाऱ्हाणे मांडले.

चिपळूण-  चिपळूणपासून २७ किलोमीटरवर तिवरेपैकी भेंदवाडी हे छोटेसे गाव अवघ्या ४६ घरांचे. गावातील बहुतेक पुरुषमंडळी मुंबईत चाकरमानी म्हणून स्थायिक झालेली. उरलेले शेतीत गुंतलेले. २००० रोजी वाडीच्या पूर्व बाजूस मातीचे धरण बांधण्यात आले. धरणाच्या एका बाजूस भेंदवाडीतील ४६ घरे व गावांची लोकसंख्या साधारण १४०० आहे.

धरणामुळे गावाला प्यायला पाणी मिळाले. आसपासचा परिसर सिंचनाखाली आला. पण, धरणाच्या डाव्या कोपऱ्यात गेल्या काही वर्षांपासून पाणी झिरपू लागले होते. पावसाळ्यात या झिरपलेल्या पाण्याचा प्रवाह वाढायचा. गावकऱ्यांनी पाटबंधारे विभागाचे अभियंता जोकर त्यांच्यापुढे धरणाच्या डाव्या बाजूने झिरपणाऱ्या पाण्याचे गाऱ्हाणे मांडले. पावसाळ्यापूर्वी त्यांनी पाच-सहा ट्रॉली माती धरणाच्या झिरपणाऱ्या जागी आणून टाकली. गावकऱ्यांना वाटले आता गळती थांबली. पण, गेल्या दोन-तीन दिवसांत परिसरात जोराचा पाऊस झाला व पुन्हा पाणी झिरपायला सुरू झाले. ही गळती नेहमीचीच, अशा अर्थाने गावकऱ्यांनी त्याकडे पाहिले. काल रात्री पावसाची रिपरिप चालू होती. रात्री साडेनऊ ते दहाची वेळ. बहुतेक घरांत रात्रीचे जेवण सुरू होते. तेवढ्यात दगड एकमेकांवर आपटल्याचा जसा आवाज होतो, तसा मोठा आवाज होण्यास सुरवात झाली. हा आवाज कशाचा, हे कोणालाच कळेना. काही जण घराबाहेर आले. धरणाच्या डाव्या कोपऱ्यातून पाण्याचा मोठा लोट आला. या पाण्याच्या लोटासोबत मोठमोठे दगडही येऊ लागले. बघता बघता लोटात दहा ते बारा घरे वाहून गेली. त्या घरातील लोकांना ओरडण्याचीही संधी मिळाली नाही. वडाच्या झाडाखाली असलेले गणपतीचे मंदिरही वाहून गेले.

एवढा प्रलय होऊनही योगायोगाने गावातला विद्युतप्रवाह चालू होता. त्या उजेडात वाचलेले काही गावकरी एकत्र आले. काही जण धरणाच्या वरच्या बाजूस दूर अंतरावर पळत जाऊन थांबले. त्यांच्या समोरून फक्त पाण्याचा मोठा लोट वाहत होता. नेमके काय झाले, याचा कोणालाच अंदाज येत नव्हता. 

घराचे अवशेष शिल्लक
पहाटे गावकरी गावाकडे पळत सुटले. त्यांच्या नजरेस उद्‌ध्वस्त गाव आले. आपल्या घराचा चौथराही शिल्लक नसल्याचे त्यांच्या ध्यानात आले आणि आक्रोशाला बांध फुटले. सगळ्यांच्या घरावर प्रलयाचा आघात, त्यामुळे कोणी कोणाला सावरायचे, अशी स्थिती उभी राहिली. पुढे आक्रोशाची जागा नि:शब्दतेने घेतली. फुटलेले धरण त्यांना समोर दिसत होते आणि त्यांच्याच पायाखाली त्यांच्याच घराचे केवळ अवशेष त्यांना 
जाणवत होते.

शुभमने वाचविले  दहा जणांचे प्राण
तिवरे-भेंदवाडी येथे पोफळीतील पाच जण पाहुणे म्हणून गेले होते. त्यापैकी चौघे वाहून गेले. शुभम मानकर (वय २१) हा तरुण वाचला. त्याने भेंदवाडीतील दहा जणांचे जीव वाचविले. मात्र, तो सहकाऱ्यांना वाचवू शकला नाही. त्यांच्या शोधासाठी रात्रभर त्याने तिवरेचा परिसर पिंजून काढला. पोफळीतील राकेश घाणेकर (३०), सुशील पवार (३२), रणजित काजवे (३२), बुबा निकम (३४) आणि शुभम मानकर (२१) रात्री पाहुण्यांकडे गेले होते. धरण फुटल्याचे समजताच घरातील लोक सामान घेऊन बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत होते. या वेळी शुभम मानकरने दहा जणांना पाण्यातून मार्ग काढत वाचविले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ratnagiri Dam Mishap Bhendwadi village