Ratnagiri Dam Mishap : बाबांना फोन लाव, असे सांगितल्यावर काय करू

मुझफ्फर खान
शनिवार, 6 जुलै 2019

चिपळूण - सुट्या संपल्यानंतरही अचानक लांबचे नातेवाईक आत्याच्या घरी का येत आहेत, हे ४ वर्षांच्या रुद्रला कळत नाही. आई-वडील हयात नसल्याची पुसटशीही कल्पनाही त्याला नाही. आठवण आली की, बाबांना फोन लावा, असं तो सांगतो. आता त्याने फोन लावायला सांगितले तर मी काय करू, असा प्रश्न त्याच्या आत्या मनाली संतोष माने यांना पडला आहे.

चिपळूण - सुट्या संपल्यानंतरही अचानक लांबचे नातेवाईक आत्याच्या घरी का येत आहेत, हे ४ वर्षांच्या रुद्रला कळत नाही. आई-वडील हयात नसल्याची पुसटशीही कल्पनाही त्याला नाही. आठवण आली की, बाबांना फोन लावा, असं तो सांगतो. आता त्याने फोन लावायला सांगितले तर मी काय करू, असा प्रश्न त्याच्या आत्या मनाली संतोष माने यांना पडला आहे.

सोमवारी रात्री तिवरे धरण फुटले आणि गावातील १४ घरे वाहून गेली. या घटनेत रणजित अनंत चव्हाण यांचे संपूर्ण कुटुंब वाहून गेले. चव्हाण यांचा चार वर्षांचा मुलगा रुद्र आत्याकडे चिपळूणला राहत असल्यामुळे वाचला. त्याचे आई-वडील आता नाहीत हे त्याला माहिती नाही. 

रुद्रचे वडील रणजित चव्हाण यांचे तिवरेजवळच दादरमध्ये सलूनचा व्यवसाय होता. व्यवसाय बरा चालला होता. रुद्रने चांगलं शिक्षण घेतले पाहिजे अशी त्यांची इच्छा होती. एवढ्यासाठीच त्यांनी आपल्या मनावर दगड ठेवत चार वर्षांच्या मुलाला आपल्यापासून ४० किलोमीटर लांब चिपळूणमध्ये ठेवले होते. रुद्रच्या आई-वडिलांनी मोठ्या हौसेने चिपळूणच्या भेंडीनाका येथील परांजपे मोतीवाले शाळेत त्याला दाखल केले होते.

१७ जूनपासून तो ज्युनिअर के. जी. मध्ये जाऊही लागला आहे. त्याचे आई-वडील, आजी-आजोबाही खूश होते. रुद्रला शाळेत जायला रिक्षाही ठरवली होती. सर्व काही ठरल्याप्रमाणे आनंदी वातावरणात सुरू होते. रुद्रचे संपूर्ण कुटुंब तिवरे भेंदवाडीत राहत होते. या दुर्घटनेत कुटुंबीयांसमवेत रुद्रचे घरही वाहून गेले आहे. सुदैवाने रुद्र आत्याकडे असल्याने वाचला. या दुर्घटनेत वाहून गेलेल्यांपैकी रणजित चव्हाण (वय २८), आई ऋतुजा रणजित चव्हाण (२४), आजोबा आनंद हरिभाऊ चव्हाण (६३) यांचे मृतदेह सापडले आहेत. आजी अनिता अनंत चव्हाण (५८) आणि त्याची दीड वर्षांची बहीण दुर्वा रणजित चव्हाण अजूनही बेपत्ता आहेत. 

वाढविण्याची जबाबदारी माझी
रुद्रला आम्ही काहीच सांगितलेले नाही. एवढ्यात त्याला आम्ही काही सांगणारही नाही. रुद्रच्या आई-वडिलांनी त्याला माझ्याकडे सोपवलं आहे. मीच आता त्याची आई आहे. आता त्याचे शिक्षण पूर्ण करून त्याला मोठा माणूस बनवण्याची जबाबदारी माझी आहे. त्याला मी कोणतीही कमतरता भासू देणार नाही, असे आत्या मनाली सांगतात तेव्हा ऐकणाऱ्यालाही हुंदका आवरत नाही. 

एक जूनला सर्व नातेवाईकांच्या उपस्थितीत रुद्रच्या आजोबांचा ६२ वा वाढदिवस साजरा केला. गावातली मंडळी या सोहळ्यात सहभागी झाली होती. पण पुढच्या एक महिन्यात असे काही होईल याचा कणभरही विचार कोणाच्या मनाला शिवलादेखील नव्हता. हे आमच्याबरोबर काय झाले हेच आम्हाला कळत नाही.
- मनाली माने
(आत्या)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ratnagiri Dam Mishap Human interest story