Ratnagiri Dam Mishap : घरातील दुखः विसरून तहसीलदार धावले मदतीला

मुझफ्फर खान
रविवार, 7 जुलै 2019

चिपळूण - तिवरे धरण फुटीची दुर्घटना मंगळवारी रात्री घडली. त्याच दिवशी चिपळूणचे तहसीलदार जीवन देसाई यांचे कोल्हापूरला सासऱ्याचे निधन झाले होते. मात्र स्वतःचे दुःख विसरून देसाई त्याच रात्री तिवरेतील आपदग्रस्तांच्या मदतीला धावले. पाच दिवस ते तिवरे गावात तळ ठोकून कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. 

चिपळूण - तिवरे धरण फुटीची दुर्घटना मंगळवारी रात्री घडली. त्याच दिवशी चिपळूणचे तहसीलदार जीवन देसाई यांचे कोल्हापूरला सासऱ्याचे निधन झाले होते. मात्र स्वतःचे दुःख विसरून देसाई त्याच रात्री तिवरेतील आपदग्रस्तांच्या मदतीला धावले. पाच दिवस ते तिवरे गावात तळ ठोकून कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. 

मंगळवारी रात्री 9.30 वाजता तिवरे धरण फुटले. ही घटना घडण्याच्या दोन तास अगोदर देसाई यांच्या सासऱ्यांवर अंत्यसंस्कार झाले होते. घरात सांत्वन करण्यासाठी येणाऱ्यांची गर्दी होती. त्याच वेळी नायब तहसीलदार तानाजी शेजाळ यांचा तहसीलदार देसाई यांना फोन आला.

तिवरे धरण फुटून अनेक घरे आणि माणसे वाहून गेल्याचे शेजाळ यांनी देसाई यांना सांगितले. त्यानंतर देसाई यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेची कल्पना दिली आणि स्वतः चिपळूणकडे रवाना झाले. जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकारी रात्रीच घटनास्थळी दाखल झाले. मध्यरात्री 1 वाजता देसाई तिवरे गावात दाखल झाले. तालुक्‍यातील मंडळ अधिकारी, तलाठी, लिपीक, कोतवाल यांनाही मदतकार्यासाठी त्यांनी रात्रीच बोलवून घेतले होते.

बुधवारची पहाट झाल्यानंतर एनडीआरएफ, पोलिस आणि महसूलचे मदत कार्य सुरू झाले. त्यांना लागणाऱ्या सर्व गरजेच्या वस्तू देसाई यांनी उपलब्ध करून दिले. आपदग्रस्तांना जिल्हा परिषदेसह सर्वच खात्याकडून मदत मिळेल अशी देसाई यांची अपेक्षा होती. मात्र अपेक्षित मदत न मिळाल्यामुळे पहिल्या दिवशी गोंधळ उडाला. आता सर्व जबाबदारी महसूलचीच आहे असे गृहित धरून देसाई यांनी महसूल कर्मचाऱ्यांच्या विविध समित्या केल्या. प्रत्येकाला जबाबदारी वाटून दिली.

भोजन समिती, पंचमाना समिती, मदत कार्य समिती अशा वेगवेगळ्या समित्या करून त्यांनी मदत कार्यात सुसूत्रता आणली. त्यामुळे पाच दिवस नियोजनपूर्वक भेंदवाडीत मदत कार्य सुरू आहे. तहसीलदारांच्या घरात दुखःद घटना घडल्याची माहिती महसूलच्या कर्मचाऱ्यांना होती. आपले दुःख विसरून तहसीलदार तिवरेवासियांची मदतीला धावल्यामुळे महसूल कर्मचाऱ्यांना स्फुर्ती मिळाली. महसूलचे सर्वच कर्मचारी आपल्या अडचणी बाजूला ठेवून तिवरेमध्ये ठाण मांडून आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ratnagiri Dam Mishap special story on Tasildar Jeevan Desai