Ratnagiri Dam Mishap : १४ वर्षांत धरणाची एकदाही दुरुस्ती नाही

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जुलै 2019

तिवरे धरणाची पावसापूर्वीची तपासणी आमच्या विभागाकडून झाली होती. दुरुस्तीची गरज असल्याचे त्यांनी अहवालात म्हटले आहे. त्यानुसार मे महिन्यात दुरुस्ती केली होती.
- सुशील लाड, सहायक जिल्हा जलसंधारण अधिकारी

रत्नागिरी - तिवरे (ता. चिपळूण) येथील फुटलेल्या धरणाची १४ वर्षांत एकदाही दुरुस्ती झालेली नाही. तिवरे धरण दुरुस्तीची आवश्‍यकता असल्याचा अहवाल मृद व जलसंधारण विभागाच्याच तज्ज्ञांनी पावसापूर्वीच्या तपासणीत दिला होता. त्याला नागरिकांच्या तक्रारीची जोड देऊन मे महिन्यात तात्पुरती दुरुस्ती केली. मात्र हे सर्व तकलादू ठरले. धक्कादायक बाब म्हणजे २००५ ला पूर्ण झालेल्या या धरणाची दोष, दायित्व आणि कालावधीची ठेकेदाराची हमी फक्त एका वर्षाचीच होती. ४ कोटींचे हे काम १२ वर्षांमध्ये १४ कोटी १७ लाखांवर गेले.
तिवरेवासीयांसाठी मंगळवारची (ता. २) रात्र काळरात्र ठरली. कोणतीही कुणकुण लागण्यापूर्वीच काळाने त्याच्यावर घाला घातला. तिवरे धरण फुटून सुमारे १५ ते १६ घरे पत्त्यासारखी वाहून गेली. त्यातील २४ लोक बेपत्ता झाले. अनेक कुटुंबे उघड्यावर पडली, काहींचा आधार संपला.

या धरणाबाबत मृद व जलसंधारण विभागाशी चर्चा केल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्या. २००५ मध्ये तिवरे धरण पूर्ण झाले. धरणाला प्राथमिक सुधारित प्रशासकीय मान्यता १९९७ ला मिळाली होती. तेव्हा ४ कोटी ४९ लाखांचे हे काम होते. २००४ मध्ये पुन्हा ते ११ कोटी १५ लाखांवर गेले. धरणाच्या कामाची दुसरी सुधारित प्रशासकीय मान्यता १४ कोटी १७ लाखांवर गेली. या धरणाचे क्षेत्रफळ १२.०.१ चौरस कि.मी. एवढा आहे. २ हजार ४५२ सहस्त्रघनमीटर पाणी साठविण्याची क्षमता आहे. 

चौदा वर्षांमध्ये एक पैसाही या धरणावर खर्च केलेला नाही. म्हणजे त्याची दुरुस्ती केलेली नाही. कोणतेही पुनर्वसन यामध्ये नाही. पावसापूर्वीची धरणांच्या सुरक्षिततेची तपासणी जलसंधारण विभागाच्या पथकाने केले होते. धरणाची दुरुस्ती करणे आवश्‍यक असल्याचे त्यांच्या अहवालामध्ये नमूद केले आहे. त्यात मे महिन्यात गतीबाबत नागरिकांनीही तक्रार केली होती. 

‘सकाळ’ने त्यावर प्रकाश टाकला होता. याचा विचार करून तत्काळ मलमपट्टी करण्यात आली; मात्र याबाबत माहिती घेतली असता जेव्हा २००५ मध्ये तिवरे धरणाचे बांधकाम पूर्ण झाले; तेव्हा या ठेकेदाराने दोष, दायित्व आणि कालावधीची धरणाच्या हमीची मुदत फक्त एक वर्ष दिल्याची धक्कादायक माहिती या विभागाकडून सांगण्यात आली. 

तिवरे धरणाची पावसापूर्वीची तपासणी आमच्या विभागाकडून झाली होती. दुरुस्तीची गरज असल्याचे त्यांनी अहवालात म्हटले आहे. त्यानुसार मे महिन्यात दुरुस्ती केली होती.
- सुशील लाड,
सहायक जिल्हा जलसंधारण अधिकारी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ratnagiri Dam Mishap Tivare special story