
रत्नागिरी : रत्नागिरीचा सर्वांगीण विकास करण्यास शासन कटिबद्ध आहे. रत्नागिरी जिल्ह्याची जागतिक स्तरावर वेगळी ओळख निर्माण करून देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले. रत्नागिरीतील मुख्य शासकीय ध्वजवंदन सोहळा सामंत यांच्या हस्ते झाला. या प्रसंगी ते बोलत होते.
ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योगखात्याची जबाबदारी मला दिली आहे. त्यामुळे अधिकाधिक उद्योग जिल्ह्यात सुरू होतील व त्यातून रोजगार निर्मिती करण्याचा आपला प्रयत्न राहील. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास ही शासनाची प्राथमिकता आहे. पर्यटन, शिक्षण, कृषी आणि उद्योगक्षेत्रात येथील क्षमता लक्षात घेऊन विकास योजना आखण्यात आल्या असून त्यानुसार शासन प्राधान्याने जिल्ह्याच्या विकासासाठी निधीदेखील देत आहे. या जिल्ह्याच्या विकासासाठी निधीची कुठेही कमतरता पडू दिली जाणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वचन दिले आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो.
जिल्ह्यातील विकासकामांसाठी नियोजन निधीतून २७१ कोटी रुपये यावर्षी मंजूर करण्यात आले आहेत. आपला जिल्हा विकसित करायचा असेल तर ग्रामीण भागात दळणवळण व्यवस्था आवश्यक आहे. हे लक्षात ठेवून यापैकी ३५ कोटी ९० लाख रुपये मुख्यमंत्री सडक योजनेवर खर्च करण्यात येणार आहेत. जिल्हा हा कोकणातील शैक्षणिकदृष्ट्या अतिशय महत्वाचा जिल्हा राहिला आहे. मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रासोबत आपण गेल्या काळात येथील कवी कालिदास संस्कृत विद्यापीठाचे उपकेंद्र आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे उपकेंद्र रत्नागिरीत सुरू केले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
पोलिस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर हा सोहळा झाला. ध्वजारोहणानंतर पोलिसदल तसेच इतर विभागांनी संचलन केले व मानवंदना दिली. या प्रसंगी इन्फिगो नेत्र रुग्णालयाचे डॉ. श्रीधर ठाकूर, न्यूरोसर्जन डॉ. विजय फडके आणि डॉ. अश्फाक काझी यांचा त्यांच्या क्षेत्रातील कार्यासाठी विशेष गौरव उद्योगमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. उपस्थितांना शुभेच्छा देत त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणारे स्वातंत्र्यसैनिक, हुतात्मा आणि देशाचे रक्षण करणारे सैनिक यांना अभिवादन केले.
धूपप्रतिबंधक बंधारे २६ ठिकाणी
१६५ किलोमीटर सागरकिनारा लाभलेल्या आपल्या या जिल्ह्यात मासेमारी आणि त्यावर अवलंबून व्यवसायदेखील मोठ्या प्रमाणावर आहेत. सततच्या वादळी स्थितीने शहरातील मिऱ्या बंदराची धूप होत आहे. यासाठी आपण १६० कोटी रुपये खर्च करून धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम सुरू आहे. यासोबतच २६ ठिकाणी असे बंधारे बांधले जाणार आहेत. जिल्ह्याचे दैवत असलेल्या श्री गणपती देवस्थान गणपतीपुळे येथे १०२ कोटी रुपये खर्चून विकास आराखड्यातील कामे सुरू आहेत. ही कामे पूर्ण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
रुग्णालय श्रेणी वर्धनाचे काम पूर्ण होणार
जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी अनेक वर्षांपासून होती. कोविड काळात याची आपणास अधिक तीव्रतेने जाणीव झाली. या महाविद्यालयाचा प्रस्ताव नुकताच राज्य सरकारने मंजूर केला याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांचे मी आभार मानतो. आगामी ३ वर्षांमध्ये या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ४३० खाटांच्या जिल्हा रुग्णालय श्रेणी वर्धनाचे काम पूर्ण होईल. याबाबत पाठपुरावा करून येत्या शैक्षणिक वर्षात येथे वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण सुरू होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त करून सामंत म्हणाले की, जिल्ह्यात विधी महाविद्यालयदेखील सुरू करणार आहोत. जिल्हा एक महत्वाचे शैक्षणिक केंद्र म्हणून नावारूपास येईल, यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे.
२७१ कोटी
विकासकामांसाठी नियोजन निधीतून मंजूर
३५ कोटी ९० लाख
मुख्यमंत्री सडक योजनेवर खर्च करणार
१०२ कोटी
गणपतीपुळे येथे विकास आराखड्यातील कामांना