esakal | यासाठी रत्नागिरी जिल्हा आहे राज्यात अग्रेसर
sakal

बोलून बातमी शोधा

Ratnagiri district first in contact tracing of corona patients

रत्नागिरी जिल्ह्याचा सरासरी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग दर हा 23 इतका आहे.

यासाठी रत्नागिरी जिल्हा आहे राज्यात अग्रेसर

sakal_logo
By
राजेश कळंबटे

रत्नागिरी - कोरोना रुग्णांच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये रत्नागिरी जिल्हा राज्यात अग्रेसर आहे. वेळीच रुग्णाचा शोध केल्यामुळे संसर्गाचा धोका कमी होतो आणि साखळी खंडीत होते. त्यासाठी तालुकास्तरावर आरोग्य पथकांची नियुक्ती केली आहे. सध्या राज्याच्या तुलनेत रत्नागिरीचा दर 23 असा आहे. 

मुंबईहून येणार्‍या चाकरमान्यांसाठी जिल्ह्यात बारा ठिकाणी स्क्रिनिंग सेंटर्स उघडण्यात आली आहेत. आतापर्यंत तिथे 11 हजार प्रवाशांची तपासणी केली असून अडीचशे अँटीजन टेस्ट केल्या आहेत.

गेल्या पाच महिन्यात जिल्ह्यात कोविड-19 चे पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याची संख्या उत्तरोत्तर वाढत आहे. त्यावर अंकुश ठेवण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर आरोग्य विभागाकडून अधिक भर दिला आहे. रुग्णाचा तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कातील व्यक्तींची यादी तत्काळ बनविण्यात येते. त्यात अधिक जोखमीच्या व कमी जोखमीच्या व्यक्ती निश्चित केल्या जातात. अधिक जोखमीच्या व्यक्तींवर पुढील चौदा दिवसांपर्यंत अलगीकरण करुन लक्ष ठेवले जाते. तसेच आवश्यकता भासल्यास त्यांचा स्वॅब घेतला जातो. त्यामुळे कोविड-19 रुग्णांचे वेळीच आणि लवकरात लवकर निदान करणे शक्य होत आहे. 


रत्नागिरी जिल्ह्याचा सरासरी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग दर हा 23 इतका आहे. त्यामुळे बाधित रुग्णांमुळे होणाऱ्या प्रसारावर रोख लावणे जिल्हा प्रशासनाला शक्य होत आहे. तालुक्याच्या ठिकाणी तालुका आरोग्य अधिकार्‍यांच्या नेतृत्त्वाखाली ही पथके कार्यरत आहे. ही पथके चोविस तास कार्यरत असून दिवस-रात्र मेहन घेताना दिसत आहेत.


दरम्यान, मुंबईकर चाकरमानी गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात येण्याची शक्यता आहे. त्यांच्याकडून कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होऊ नये म्हणून जिल्हा आरोग्य विभाग सतर्क आहे. येणार्‍या प्रवाशांची तपासणी करण्यासाठी जिल्ह्यात बारा ठिकाणी स्क्रिनिंग सेंटर्स कार्यान्वित आहेत. त्यात मंडणगड- डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह, दापोलीत कोंकण कृषी विद्यापीठ आणि रत्नदुर्ग, खेड उपजिल्हा रुग्णालय कळंबणी, गुहागर डॉ. तात्यासाहेब नातू इंग्लीश स्कूल मार्गताम्हाणे, चिपळूण शिवाजीनगर बसस्थानक, संगमेश्वर आरवली जिल्हा परिषद शाळा आणि महात्मा गांधी विद्यामंदीर साखरपा, रत्नागिरी दामले विद्यालय आणि मेस्त्री हायस्कूल, लांजा कृषि विज्ञान केंद्र देवधे, राजापूर खापणे कॉलेज समाजकल्याण वसतीगृह रायपाटण यांचा समावेश आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत या स्क्रिनिंग सेंटर्सवर 11 हजार प्रवाशांची तपासणी केली असून अडीचशे प्रवाशांची अँटीजन टेस्ट झाली आहे.

हे पण वाचामुलांच्या मानसिकतेवर कोरोनाचा असा होतोय परिणाम

 
कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी जिल्हाधिकारी यांच्या सुचनेनुसार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे वेळीच रुग्णांचा शोध घेणे शक्य होत असल्याचे जिल्हा परिषद जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सांगितले.

संपादन - धनाजी सुर्वे
 

loading image