
रत्नागिरी : कॅन्सरवरील किरणोपचारासाठी जिल्हा रुग्णालय यंत्रणा सज्ज
रत्नागिरी : कर्क रोगावर शस्त्रक्रियेऐवजी रेडिएशनद्वारे उपचार करून हा आजार बरा करणारे रेडिएशन ऑन्कॉलॉजी युनिट (कॅन्सरवरील किरणोपचार) रत्नागिरीत होणार आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयाने त्यासाठी जागेपासून सर्व तयारी असल्याचा प्रस्ताव शासनाला सादर केला आहे. चिपळूणच्या वालावलकर रुग्णालयाव्यतिरिक्त जिल्ह्यात अन्य कुठेही ही उपचार पद्धती नाही. जिल्हा रुग्णालयात हे युनिट झाल्यास अनेक कॅन्सर रुग्णांचा त्याचा फायदा होणार असून, आर्थिकदृष्ट्याही ते परवडणारे ठरणार आहे. एवढेच नव्हे, तर कॅथ लॅबच्यादृष्टीनेही आमची तयारी आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी दिली.
राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय सोयी-सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत कॅन्सरवरील किरणोपचारासाठी जिल्हा रुग्णालय यंत्रणा सज्ज झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यामध्ये प्रामुख्याने रत्नागिरीत रेडिएशन ऑन्कॉलॉजीची युनिट स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विमा कंपन्यांशी झालेल्या सामंजस्य करारानुसार राज्य आरोग्य हमी सोसायटीस उपलब्ध झालेल्या २७२.७१ कोटी इतक्या निधीतून या वैद्यकीय सोयी सुविधा उभारण्यात येतील. यामध्ये ठाणे, रत्नागिरी, बारामती, जालना येथे रेडिएशन ऑन्कॉलॉजीची युनिट स्थापन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे जिथे वैद्यकीय महाविद्यालये नाहीत अशा १९ जिल्ह्यांमध्ये कॅथलॅब, सीव्हीटीएस ऑपरेशन थिएटर, लॅमिनार ऑपरेशन थिएटर, ईएसडब्ल्युएल मशिन व २५ ते ३० डायलेसिस मशिन्स स्थापन करण्यात येणार आहेत. या संदर्भात कार्यवाही करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात येईल.
याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. फुले म्हणाल्या, रेडिएशन ऑन्कोलॉजी युनिट (कॅन्सरवरील किरणोपचार) सुरू करण्याबाबत आम्ही प्रस्ताव दिला आहे. नुकतीच याबाबत व्हिडिओ कॉन्फरन्स झाली असून आम्ही युनिट सुरू करण्याबाबत तयार असल्याची माहिती शासनाला दिली आहे. त्यासाठी मॅटॅनिटी वॉर्ड येथे हे युनिट बसविणे प्रस्तावित केले आहे. तसेच जिथे वैद्यकीय महाविद्यालये नाहीत अशा १९ जिल्ह्यांमध्ये कॅथलॅब सुरू केली जाणार आहे. त्यासाठीही आम्ही तयारी दर्शविली आहे.
अचूक उपचारपद्धती
रेडिएशन ऑन्कोलॉजी युनिटमध्ये अत्यंत प्रगत, अत्याधुनिक आणि जगभरात प्रसिद्ध असलेले एलेक्टा सिनर्जी मशिन आहे, ज्याची आजूबाजूच्या निरोगी पेशींना त्रास न होऊ देता केवळ कॅन्सर प्रभावित भागाला लक्ष्य करण्याची अचूकता ९९ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. ८० टक्क्यांपेक्षा जास्त कॅन्सर रुग्णांना रेडिएशन थेरपीचे उपचार घ्यावे लागतात. कमीतकमी दुष्परिणाम होत असलेली ही उपचारपद्धती अत्यंत प्रभावी आहे.
Web Title: Ratnagiri District Hospital System Ready Radiation Treatment
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..