'पर्यटनासाठी जगातला सर्वोत्तम जिल्हा होण्याची रत्नागिरीची क्षमता' 

मकरंद पटवर्धन
Wednesday, 27 January 2021

जिल्हा नियोजनमध्ये सर्वात जास्त तरतूद पर्यटनासाठी केली.

रत्नागिरी - शासनाने पर्यटनाला उद्योगाचा दर्जा देऊन व्यावसायिकांचे बरेच काम हलके केले आहे. त्याचा उपयोग करून हे क्षेत्र वाढवण्यासाठी पावले उचलायला हवीत. पर्यटनासाठी जगातला सर्वोत्तम जिल्हा होईल एवढी क्षमता आहे. ही क्षमता वाढवण्यासाठी शासन भरपूर प्रयत्न करणार आहे. या प्रयत्नांवर गेल्या दहा महिन्यांत कोरोनाचे विरजण पडले. जिल्हा नियोजनमध्ये सर्वात जास्त तरतूद पर्यटनासाठी केली. असे प्रतिपादन पालकमंत्री अ‍ॅड. अनिल परब यांनी केले.

रत्नागिरीतील टीआरपी येथील अंबर हॉलमध्ये तिसर्‍या शाश्‍वत पर्यटन परिषदेचे उद्घाटन केल्यावर ते बोलत होते. पर्यटन वाढ करा म्हणताना जाचक अटी घालून ठेवल्या तर काही उपयोग नाही, यासंबंधी आज जिल्हाधिकार्‍यांना बोलावले होते. केंद्र किंवा राज्य सरकारच्या अशा अटी, नियम असतील तर त्या शिथिल करण्यासाठी प्रयत्न करू.
अ‍ॅड. परब म्हणाले, कोकणची पर्यटनासाठी प्रसिद्ध जगभरात वाहवा होते. परंतु पर्यटन वाढीसाठी आवश्यक बाबी पूर्ण होत नाहीत, त्यांची सांगड घातली जात नाही तोपर्यंत उपयोग नाही. मी पालकमंत्री झालो तेव्हा पर्यटनवाढीच्या दृष्टीने सर्व आढावा घेतला. समुद्रकिनार्‍यावर सहज सुलभ पर्यटनासाठी किमान छोट्या छोट्या सुविधा देण्याचा प्रयत्न आहे. आपण गोव्याशी स्पर्धा करू शकतो. परंतु रत्नागिरी जिल्ह्याने सिंधुदुर्गशी पर्यटन सुविधांच्या दरांची स्पर्धा करावी लागेल. 

या वेळी माजी आमदार बाळ माने, राजू भाटलेकर, सुधीर रिसबूड, किशोर धारिया, पर्यटन संचालक हेडे, प्रांताधिकारी विकास सूर्यवंशी आदी उपस्थित होते. पर्यटन उद्योगासाठी लक्षण काम करणार्‍या बबनराव पटवर्धन, सुनीलदत्त देसाई, ममता नलावडे, वैभव सरदेसाई, प्रमोद केळकर, आदींचा सन्मान या वेळी करण्यात आला.

पर्यटनाचे तीन हंगाम गेले. आता पर्यटनाला चालना देण्यासाठी काय केले पाहिजे, पर्यटक, व्यावसायिकांची काय अपेक्षा आहे, यात काय सर्वोत्तम करू शकतो याचा आराखडा बनवत आहोत. आपल्याला जगातल्या सर्व सुविधा येथे देता येणार नाही. पर्यटनाचा केंद्रबिंदू ठरण्यासाठी लोक आकर्षित होण्यासाठी कृषी पर्यटन, बीच शॅक्स धोरण आणले. फक्त धोरण जाहीर करून नव्हे तर अमलजबावणी करण्यासाठी प्रयत्न करणारा मी कार्यकर्ता असल्याचे परब यांनी सांगितले.

 संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ratnagiri district tourism anil parab