मृत्यू दर कमी करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा प्रशासन हा करणार उपाय

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जुलै 2020

जिल्ह्याचा कोरोनाग्रस्तांचा शून्यांपर्यंत गेलेला बाधितांचा आकडा आता 599 पर्यंत वाढला आहे.

रत्नागिरी : कोरोनाने मंगळवारी 26 वा बळी घेतला आणि पुन्हा रत्नागिरी जिल्हा हादरून गेला. दिवसेंदिवस बिकट परिस्थिती सावरण्यासाठी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कोरोना टास्क फोर्सची बैठक झाली आणि त्यात कोरोनामुळे होणारा मृत्यू दर कमी करण्यासोबतच रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरपी सुरू करण्याचा प्रस्ताव पाठवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय झाला. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. 

जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण 8 मार्च 2020 रोजी सापडला. त्यानंतर शून्यांपर्यंत गेलेला बाधितांचा आकडा आता 599 पर्यंत वाढला आहे. या पार्श्‍वभूमीवर रुग्णनिहाय वय आणि लिंग यांच्या आधारे रुग्णसंख्येत झालेल्या वाढीबाबत सादरीकरणातून आढावा यावेळी घेण्यात आला. "कॅच देम अर्ली' अर्थात रुग्ण तपासणीचा वेग वाढवून लवकर निदान करणे आणि "अर्ली रेफर' अर्थात रुग्णाची प्रकृती बघून तातडीने त्यासाठी विशेषतज्ज्ञांचा सल्ला घेऊन उपचार करणे, या माध्यमातून मृत्यूदर कमी करण्यावर चर्चा झाली. आयसीएमआरने काही नव्या औषध प्रणालीचाही सल्ला जारी केला आहे. त्यावरही चर्चा झाली. 

प्लाझ्मा थेरपीचा कोरोना बाधितांना लाभ होत आहे. यामुळे मृत्यूचे प्रमाण कमी होत आहे. जिल्ह्यात अशी उपचार प्रणाली सुरु करण्याबाबत आयसीएमआरला प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. मुंबईहून येणाऱ्या महिला आणि विशेषत: जिल्ह्यातील गर्भवती महिलांची तपासणी वाढविण्याचा निर्णयही झाला. जिल्हा रुग्णालयात नियमित रुग्ण उपचारांसोबत संशोधन कार्यदेखील होण्याची आवश्‍यकता आहे, याबाबतही चर्चा झाली. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बघाटे तसेच समितीचे सदस्य असणारे तज्ज्ञ डॉक्‍टर उपस्थित होते. 

जिल्ह्यात बाधितांची संख्या 599 वर पोचली आहे. यात रत्नागिरीत नव्याने तीन पॉझिटिव्ह सापडले आहेत. हर्णे बाजारपेठ येथील एका 68 वर्षीय रुग्णाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. मंगळवारी आढळलेल्या पॉझिटिव्ह 19 पैकी रत्नागिरीतील तीन रुग्ण आहेत. यात शिरगाव तिवंडेवाडी, राजीवडा आणि गावडे आंबेरे येथे रुग्ण सापडले आहेत. 

       जिल्ह्याची स्थिती 

  • ता. 30 जून अखेर बाधित - 599 
  • प्रलंबित अहवाल - 260 
  • कोरोनामुक्तांची संख्या - 439 
  • मृत्यू - 26 
  • सध्या उपचार घेणारे - 133 + 1 
  • तपासण्यात आलेले नमुने - 9 हजार 598 
  • तपासणी अहवाल प्राप्त - 9 हजार 338 
  • निगेटिव्ह अहवाल - 8 हजार 704 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ratnagiri district will try to reduce the death rate