कृषीचा फंडा: रत्नागिरीत 'या' तालुक्यात 3 हजार हेक्टर भातक्षेत्रात वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरीत 'या' तालुक्यात 3 हजार हेक्टर भातक्षेत्रात वाढ

रत्नागिरीत 'या' तालुक्यात 3 हजार हेक्टर भातक्षेत्रात वाढ

रत्नागिरी : जिल्ह्यात दरवर्षी ६७ हजार ५०० हेक्टरवर भात लागवड केली जाते; मात्र यंदा ७० हजार ५७२ हेक्टरवर लागवड झाली असून तुलनेत तीन हजार हेक्टरवर वाढ झाली आहे. कोरोना काळात अनेकजण नोकऱ्‍या, रोजगाराला मुकल्यानंतर शेतीकडे वळले. परिणामी गावागावातील रिकामे राहिलेले शेतीक्षेत्र लागवडीखाली आले.

कोकणमध्ये पारंपरिक पद्धतीने भात लागवड केली जाते; परंतु गेल्या काही वर्षात भातशेती ही खर्चिक होऊ लागल्यामुळे गावागावांतील जमीन पडिक राहू लागली होती. गावातील तरुण रोजगारासाठी मुंबईकडे वळतात. जिल्ह्यातून अन्य जिल्ह्यात स्थलांतरात रत्नागिरीचा क्रमांक लागतो.

हेही वाचा: विरोधकांना त्यांची जागा दाखवून द्या; नारायण राणेंचे आवाहन

दरवर्षी जिल्ह्यात ६७ हजार ५०० हेक्टरवर भात लागवड केली जाते. यंदा २ हजार ७२ हेक्टरने क्षेत्र वाढलेले आहे. गतवर्षीपासून कोरोनामुळे टाळेबंदी झाली आणि मुंबईकर चाकरमानी गावाकडे परतले. गावात आल्यानंतर करायचे काय, असा प्रश्‍न त्यांच्यापुढे होताच. त्यामुळे अनेकांनी पडीक जमिनीत शेती करण्यास सुरवात केली. शेतीसाठी घरात माणसे उपलब्ध राहिल्यामुळे कामे करणेही शक्य झाले. गतवर्षी कृषी, महसूल विभागाकडून झालेल्या पाहणीत तेवढी वाढ दिसून आली नव्हती. यावर्षी कृषी विभागाने ऑनलाइन नोंदणीचा फंडा राबवला होता. कृषी पर्यवेक्षक प्रत्यक्ष जागेवर जाऊन भातशेतीची नोंदणी करत होते. परिणामी पडीक जमिनीवर झालेल्या लागवडीचीही नोंद झाली. प्रत्यक्षात यंदा किती भात लागवडीत वाढ झाली, ते समजू शकले. त्याचबरोबर निसर्गानेही बळीराजाला साथ दिली.

चारही तालुक्यांत चाकरमानी अधिक

यंदा तौक्ते वादळामुळे १६ मे रोजी पाऊस झाला. त्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाला सुरवात झाली. भाताच्या पेरण्या लवकर झाल्या आणि अजूनही कोरोनातील परिस्थिती जैसे थे च असल्याने काही चाकरमानी अजूनही गावातच आहेत. त्यामुळे लागवडीकडील कल यंदा अधिक असल्याचे कृषी, महूसल विभागाच्या नोंदींवरून निश्‍चित झाले आहे. संगमेश्‍वर, खेड, राजापूर आणि दापोली या तालुक्यातील भातक्षेत्र वाढलेले आहे. या चारही तालुक्यात चाकरमान्यांची संख्या अधिक आहे.

अनेक चाकरमानी कोरोनामुळे गावाकडेच राहिले. पडिक जमिनी भात लागवडीखाली आल्या आहेत. त्यामुळे यंदा क्षेत्रात वाढ झालेली दिसते.

- विनोद हेगडे, तालुका कृषी अधिकारी

loading image
go to top