esakal | Ratnagiri : पाचशे वर्षांची परंपरा जपणारे गणपतीपुळे!
sakal

बोलून बातमी शोधा

Ratnagiri : पाचशे वर्षांची परंपरा जपणारे गणपतीपुळे!

Ratnagiri : पाचशे वर्षांची परंपरा जपणारे गणपतीपुळे!

sakal_logo
By
राजेश कळंबटे

आराध्य दैवत म्हणून श्रीगणेशाचे स्थान अढळ आहे. महाराष्ट्रात अष्टविनायकाशिवाय गणपतीपुळेतील श्रीगणेशाचे भक्तही मोठ्या प्रमाणात आहेत. धार्मिक पर्यटनाचा विचार करता गणपतीपुळ्याचा क्रमांक नेहमीच अग्रस्थानी राहिला आहे. धार्मिक बाब याबरोबरच ‘एक गाव एक गणपती’ ही प्रथा पाचशे वर्षे पाळली जात आहे, हे आगळे वैशिष्ट्य.

- राजेश कळंबटे, रत्नागिरी.

मंदिराच्या पायऱ्यांचा स्पर्श करण्यासाठी आसुसून धावणाऱ्या लाटा...जणू श्रीगणेशाच्या पायांवर अभिषेक घालण्यासाठी प्रयत्नशीलच. या लाटांची सातत्याने भरून राहिलेली गाज...किनाऱ्याला लागून माडा-पोफळांनी समृद्ध निसर्ग... आणि मावळतीची सूर्यकिरणे अंगावर मिरविणारे गजाननाचे वैशिष्ट्यपूर्ण मंदिर...मंदिरापुढील देखण्या दीपमाळा... मंदिराची सुबक रचना...त्यासाठी वापरलेला तांबूस रंगाचा दगड... त्यावरील नक्षीकाम आणि आत भक्तांना आशीर्वादाने आश्‍वस्त करणारी श्री गणेशाची सुंदर स्वयंभू मूर्ती... पाहणाऱ्याला भान हरपायलाच व्हावे... गणपतीपुळेतील गणेश मंदिरात भक्तांसाठी मिळणारा अनुभव शब्दातीत. या गणपतीपुळ्यातील गणेशोत्सवही आगळीवेगळी परंपरा जपणारा.

गणपतीपुळ्याच्या जवळपासच्या पाच गावांत गेली अनेक वर्षे घरामध्ये गणपती आणला जात नाही. गणपतीपुळ्यातील मंदिरातील गणपती हाच आपल्या घरात आणला जाणारा गणपती असल्याचे मानत येथील रहिवासी या गणपतीचीच मनोभावे पूजा करतात. मंदिरातील गणेशाचे दर्शन घेऊन येथील गणेशोत्सवास प्रारंभ होतो; मात्र त्याचा अंश आपल्या घरात पाहिजे म्हणून पाटावर रूपकात्मक गणपतीही काही भक्त मांडतात. गणपतीपुळे आणि परिसरात ‘एक गाव एक गणपती’ ही प्रथा गेली पाचशे वर्षे आहे.

या साऱ्यांसाठी एकच गणपती तो म्हणजे पुळ्याचा. गेल्या वर्षी कोरोनामुळे गणेशभक्तांना दर्शनासाठी मंदिर खुले करणे शक्य झाले नव्हते; मात्र भक्तांनी परंपरा मोडली नाही. घरी गणपती आणला नाही. श्री गणरायाच्या चरणाचे तीर्थ लोकांपर्यंत पोचवण्यासाठी मंदिर व्यवस्थापनाने प्रयत्न केले होते. ‘एक गाव एक गणपती’ अशी संस्कृती मालगुंड, निवेंडी, गणपतीपुळे, नेवरे, भगवतीनगर आदी गावांत सुरू आहे. गावांमध्ये घरात नैवेद्य तयार करून तो मंदिरात नेऊन दाखविला जातो. तेथील तीर्थ घरी आणून त्याची पूजा केली जाते. यंदाही गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे;

मात्र असे असले तरी मंदिर व्यवस्थापनाने प्रतीकात्मक दर्शनाची व्यवस्था केली आहे. पाच गावांतील प्रत्येकी २५ ग्रामस्थांना गणपतीपुळे मंदिराच्या पश्चिमेकडील दरवाजाकडून दर्शन दिले जाणार आहे. मंदिरात नैवेद्य आणून दाखवला जातो. त्यानंतर एकमेकांच्या घरातील नैवेद्य या ठिकाणी प्रसाद म्हणून वाटले जातात. गणपतीपुळ्यात स्थायिक असलेले अनेकजण ही प्रथा पाळतात; मात्र बाहेरगावाहून आलेलासुद्धा गणपतीपुळ्याला येऊन राहिला तर तोही या प्रथेप्रमाणे घरी गणपती आणत नाही, हे विशेष.

भक्तांसाठी पंच कमिटी दक्ष

या मंदिराची बांधिलकी भक्तांप्रति आहे. त्यामुळे पूरग्रस्तांना मदत करण्यापासून अनेक समाजोपयोगी कामे व्यवस्थापन करीत असते. गणपतीपुळ्यात येणाऱ्या पर्यटकांची सुरक्षा आणि मंदिराची व्यवस्था याबाबत अत्यंत दक्षपणे व्यवस्थापन केले जाते. त्यामुळे प्रत्येक उत्सवात होणारी गर्दी म्हणजे भक्तांची मांदियाळी असल्याने साऱ्यांना श्रींचे दर्शन मिळून त्यांचे पूर्ण समाधान होईल, याबाबत पंच कमिटी दक्ष असते.

loading image
go to top