कोकण कन्येची सह्याद्री खोऱ्यातील सर्वात कठीण सुळक्‍यावर चढाई 

ratnagiri girl 19 year Vaishnavi Dayaram Srinath Wazir Sulka Sir in Sahyadri valley
ratnagiri girl 19 year Vaishnavi Dayaram Srinath Wazir Sulka Sir in Sahyadri valley

रत्नागिरी - जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून शहरातील खडपेवठार येथील 19 वर्षाची वैष्णवी दयाराम श्रीनाथ हिने सह्याद्रीच्या खोऱ्यातील सर्वात कठीण श्रेणीत गणलेला वजीर सुळका सर करत "लेक वाचवा लेक जगवा' हा संदेश देत स्त्री शक्तीचा जागर केला. 

निसरडी गवताळ पाऊलवाट, अतिकठीण चढाई, सुळक्‍याच्या पूर्वेकडील उतार जवळपास 600 फूट खोल, चढाई करताना पाय जरी निसटला तर दरीच्या जबड्यातच विश्रांती. वजीर सुळका सर करण्यासाठी मानसिक व शारीरिक कणखरता असावी लागते. खडकाच्या खाचांमध्ये हाताच्या आणि पायाच्या बोटांनी मजबूत पकड करून आरोहण करावे लागते. 

वैष्णवी ही वि. स. गांगण कला व वाणिज्य ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी आहे. "लेक वाचवा लेक जगवा' हा संदेश देत वजीर सुळक्‍यावर तिने चढाई करून "छत्रपती शिवाजी महाराज की जय', "झाशीच्या राणीचा विजय असो', "सावित्रीबाई फुले यांचा विजय असो', अशी घोषणा देत सुळक्‍यावर तिरंगा फडकावला. या मोहिमेचे संकलन रत्नागिरीतील माऊंटेनिअर्स असोसिएशनचे सेक्रेटरी राजेश नेने व सदस्य आकाश पालकर (आडी) व त्यांच्या टीमने केले. मोहिमेदरम्यान लागणारा टेक्‍निकल सपोर्ट नाशिक येथील पॉइंट ब्रेक ऍडव्हेंचरचे संचालक जॉकी साळुंखे व टीमने दिला. समाजसेविका माई सावर्डेकर यांच्या हस्ते तिचा सन्मान करून या मोहिमेची सांगता करण्यात आली. 
  
सुळक्‍याचे दृश्‍य पाहून थरकाप 
ठाणे जिल्ह्यातील शहापूरच्या माहुली किल्ला परिसरातील हा सुळका"वजीर सुळका" नावाने ओळखला जातो. दुर्गम परिसर, उंचच उंच टेकड्या, घनदाट जंगल आणि त्या मधोमध असलेल्या हा 90 अंशातील 280 फूट उंचीचा वजीर सुळका आहे. या सुळक्‍याचे दृश्‍य पाहून थरकाप उडतो. तेथे या सुळक्‍याची चढाई करण्याची कल्पना करणे अशक्‍यच. 
 
हिमालयातील शिखरे सर करणार 
तीन महिन्यापूर्वी वैष्णवी हिने 400 फूट उंचीचा वानरलिंगी सुळका चढाई केला होता. राज्यातील सुळके व शिखरे सर करत हिमालयातील शिखरे सर करण्याचा तिचा मानस असल्याचे तिने सांगितले. 

समाजामध्ये महिलांना कमी लेखले जाते, स्त्री भ्रूण हत्या, अत्याचार अशा गोष्टी प्रचंड प्रमाणात घडत आहेत. समाज प्रबोधनासाठी "लेक वाचवा लेक जगवा' हा संदेश देत वजीर सुळक्‍यावर चढाई केली. 
-वैष्णवी श्रीनाथ 


 संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com