
रत्नागिरी : नोकरी सोडून गोपालन, उत्तम व्यवसायाची जोड
संगमेश्वर: गोपालनाला अधिक महत्त्व आहे. गायीचे दूध, तूप हे आरोग्यदायी समजले जाते. याचा अभ्यास करून मुंबई येथे फायनान्स कंपनीत १५ वर्षे नोकरीला असणाऱ्या संगमेश्वर तालुक्यातील डिंगणी येथील पदवीधर तरुणाने नोकरी सोडून गावी येत गीर गायींचे पालन करत त्याला उत्तम व्यवसायाची जोड देत पशुपालन यशस्वी करून दाखवले आहे. विलास तुकाराम मिरगल असे या तरुणाचे नाव असून, त्यांची जिद्द कौतुकास्पद आहे.
विलास हा संगमेश्वर तालुक्यातील डिंगणी गवळीवाडी येथील युवक. लहानपणापासून याला गायी गुरांची आवड होती. वाणिज्य शाखेतून पदवीधर झाल्यावर नोकरीसाठी मुंबईचा रस्ता धरला. एका फायनान्स कंपनीत नोकरी करत असताना गावाकडील स्वमालकीची जमीन त्याला स्वस्थ बसू देईना. फायनान्स कंपनीत १५ वर्षे नोकरी केल्यानंतर त्याने गावची वाट धरली. वडील तुकाराम यांनी त्याला सहकार्याचा हात दिला. कोणत्या जातीच्या गायी आणायच्या, यावर त्याने अभ्यास केला. तज्ञांचे मार्गदर्शनदेखील घेतले. अमरेली गुजरात येथून सहा गीर गायी आणून त्यांनी गोपालन सुरू केले. डिंगणी गवळीवाडी हा अत्यंत दुर्गम भाग आहे. या वाडीत जाण्यासाठी धड रस्तादेखील नाही. अशाठिकाणी गीर गायी आणून दुग्धोत्पादन करणे हे नक्कीच धाडसाचे होते.
संगमेश्वर आणि देवरूख बाजारपेठेत जाण्या-येण्यात दररोज खूप वेळ खर्च होणार होता. एका गायीपासून ३ ते १६ लिटर एवढे दूध त्यांना मिळू लागले. एकूण ५० ते ६० लिटर दुधाचे संकलन होऊ लागले आणि या दुधाला लिटरला ७० रुपये भावही मिळत होता. पत्नी आणि आईच्या सहकार्याने तूप तयार करणे सुरू केले. या तुपाला किलोला २५०० रुपये दर मिळत आहे. महिन्याला सुमारे १० किलो तुपाची विक्री करत असल्याचे मिरगल यांनी सांगितले.गीर गायी मूळ गुजरातच्या असल्या तरी त्यांना कोकणातील हवामान मानवते. तरीही साधारण दोन महिन्यांनी सर्व गायी, पाड्या, वळू यांची आरोग्य तपासणी मिरगल करून घेतात.
Web Title: Ratnagiri Gopalan Quits Job Good
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..