रत्नागिरीतून थेट हापूस निर्यातीला कृषी, अपेडाचा "ब्रेक' 

राजेश कळंबटे - सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

रत्नागिरी - "मॅंगोनेट'द्वारे युरोपात आंबा निर्यातीसाठी पूरक यंत्रणा उपलब्ध करून दिली गेली; मात्र रत्नागिरीतील पॅक हाऊसमधून गेल्यावर्षी एकही टन आंबा युरोपला निर्यात झाला नाही. त्यामुळे आंबा बागायतदारांसह निर्यातदारांनी नाराजी व्यक्‍त केली आहे. उष्णजल प्रक्रियेचे निकष आणि कृषी विभागाकडून फायटो सर्टिफिकेटसाठी आवश्‍यक त्या गोष्टींची पूर्तता केलेली नव्हती. यावर्षीही हाच पाढा वाचण्याची भीती बागायतदारांकडून वर्तविली जात आहे. 

रत्नागिरी - "मॅंगोनेट'द्वारे युरोपात आंबा निर्यातीसाठी पूरक यंत्रणा उपलब्ध करून दिली गेली; मात्र रत्नागिरीतील पॅक हाऊसमधून गेल्यावर्षी एकही टन आंबा युरोपला निर्यात झाला नाही. त्यामुळे आंबा बागायतदारांसह निर्यातदारांनी नाराजी व्यक्‍त केली आहे. उष्णजल प्रक्रियेचे निकष आणि कृषी विभागाकडून फायटो सर्टिफिकेटसाठी आवश्‍यक त्या गोष्टींची पूर्तता केलेली नव्हती. यावर्षीही हाच पाढा वाचण्याची भीती बागायतदारांकडून वर्तविली जात आहे. 

युरोपात आंबा निर्यातीला दोन वर्षांत ग्रहण लागले आहे. दरवर्षी कोणत्या ना कोणत्या अडचणी येत आहेत. त्याला सामोरे जाताना आंबा बागायतदारांची तारांबळ उडते. उष्णजल प्रक्रिया करून आंबा पाठविला तर फळाचा दर्जा घसरेल, अशी भीती बागायतदारांकडून व्यक्‍त केली जात होती. ती काही प्रमाणात खरीही ठरली आहे. गेल्यावर्षी मुंबईतील खासगी ठिकाणांहून उष्णजल प्रक्रियेने आंबा निर्यात केला गेला. त्यातील 20 टक्‍के आंब्यावर परिणाम झाल्याचे निर्यातदारांकडून सांगण्यात आले. त्याची गंभीर दखल भारतीय यंत्रणांकडून घेण्यात आलेली नाही. कोकण कृषी विद्यापीठ, पणन आणि आंबा-काजू बोर्डातर्फे उष्णजल प्रक्रियेच्या परिणामावर संशोधन करण्यात आले. 48 अंश सेल्सिअसला 60 मिनिटांची प्रकिया झाली, तर आंबा उकळलेल्या फळासारखा होतो. संशोधनाअंती 47 अंश सेल्सिअसला 50 मिनिटे आंबा ठेवल्यास परिणाम होत नसल्याचा फॉर्म्युला तयार केला गेला. त्याचा प्रस्ताव क्‍वारंटाईन विभागाकडे गेला; परंतु अद्यापही त्यावर निर्णय झालेला नाही. दोन दिवसांपूर्वी रत्नागिरीत झालेल्या कार्यशाळेत कृषी विभागाचे दिगंबर साबळे यांनी येत्या महिन्याभरात नवीन फॉर्म्युला अंमलात आणण्यास परवानगी मिळेल, असे सांगितले होते. ही आनंदाची बाब असली तरीही गेल्यावर्षी हा मुद्दा रत्नागिरीतून थेट युरोप निर्यातीमधील प्रमुख अडथळा बनला होता. 

निर्यातीपूर्वी कृषी विभाग फायटो प्रमाणपत्र देते. त्यासाठी अपेडाच्या वेबसाईटवर नोंदणी अत्यावश्‍यक असते. रत्नागिरीतून त्याची तांत्रिक माहिती पूर्ण केलेली नसल्याने गतवर्षी बागायतदार तयार असतानाही फायटो सर्टिफिकेट कृषी विभागाला देता आलेले नाही. यावर्षी 15 मार्चला आंबा युरोपात निर्यात करण्यासाठी बागायतदार सज्ज आहेत. त्यामुळे कृषी विभागाची जबाबदारी वाढली आहे. फायटोसाठी आवश्‍यक तांत्रिक मंजुरींची पूर्तता करणे आवश्‍यक असल्याची सूचना बागायतदार आणि निर्यातदारांनी केली आहे. त्यावर कृषीचे अधिकारी गांभीर्याने लक्ष देणार का, असाच प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

रत्नागिरीतील काही बागायतदारांशी चर्चा करून आंबा थेट युरोपला आणण्याचा आमचा प्रयत्न होता; मात्र तांत्रिक अडचणीमुळे आम्हाला ते शक्‍य झाले नाही. यावर्षी त्या अडचणी येऊ नयेत, यासाठी योग्य त्या उपाययोजना झाल्या पाहिजेत. गेल्यावर्षी वाशी येथील बाष्पजल प्रक्रियेद्वारे बहुतांश आंबा युरोपला पाठविण्यात आला. 
- तेजस भोसले, युरोप निर्यातदार. 

बागायतदारांना जेव्हा आंबा निर्यात करावयाचा असेल, त्या वेळी फायटो सर्टिफिकेट उपलब्ध करून दिले जाईल. त्यादृष्टीने कृषी विभागाकडून आवश्‍यक तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केली आहे. गतवर्षीप्रमाणे अडचणी निर्माण होणार नाहीत. 
- एच. आर. भोसले, सहसंचालक, कृषी विभाग 

Web Title: ratnagiri hapus mango

टॅग्स