कोरोनासाठी धोका ठरणाऱ्या कोमॉर्बिड आजाराचे रत्नागिरीत प्रमाण जास्त   

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 1 October 2020

कोमॉर्बिड आजारांमध्ये उच्चदाब, मधुमेह, न्युमोनिआ, ह्यदयरोगाचा समावेश आहे. मार्च महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाला.

रत्नागिरी - कोरोना बाधितांपैकी अतिगंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. असे आजार असलेल्यांनी सर्वाधिक सुरक्षितता बाळगावी यासाठी आरोग्य विभागाकडून आवाहन केले जाते. माझे कुटूंब, माझी जबाबदारी मोहिमेत कोमॉर्बिड आजारी असलेेले जिल्ह्यात 76 हजार 684 रुग्ण आहेत. तपासलेल्या रुग्णांच्या तुलनेत हा आकडा दहा टक्के आहे.

कोमॉर्बिड आजारांमध्ये उच्चदाब, मधुमेह, न्युमोनिआ, ह्यदयरोगाचा समावेश आहे. मार्च महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर देशभरात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. मृत्यूचेही प्रमाण अधिक आहे. रत्नागिरी जिल्ह्यात बाधितांचा आकडा गेल्या आठ दिवसांमध्ये कमी आला आहे; मात्र मृतांचे प्रमाण वाढलेले आहे. आतापर्यंत 261 रुग्ण मृत पावलेले आहेत. त्यातील बहूतांशी रुग्ण हे 55 वर्षांवरील आणि कोमॉर्बिड आहेत. त्याला आरोग्य विभागाकडूनही दुजोरा मिळालेला आहे. वयस्कर आणि व्याधींनी ग्रस्त असलेल्या रुग्णाची प्रतिकार शक्ती कमी होत जात असल्यामुळे त्यांचा मृत्यू होतो. ही बाब लक्षात घेऊन शासनाने वयस्कर व्यक्तींनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये अशा सुचना अजुनही कायम ठेवलेल्या आहेत. कोरोनासाठी धोक्याचे ठरणारे कोमॉर्बिड रुग्णाचे प्रमाण रत्नागिरी जिल्ह्यात अधिक असल्याचे दिसते. माझं कुटूंब, माझी जबाबदारी या मोहिमेंतर्गत घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी केली जात आहे. आतापर्यंत सुमारे साडेनऊ लाख लोकांपर्यंत आरोग्य पथके पोचली आहेत. त्यातील किरकोळ आजार असलेले, सारी व कोरोना बाधित असलेल्यांची तपासणी करुन त्यांना उपचारासाठी दाखल केले जात आहे; मात्र यामध्ये अतिगंभीर व्याधींनी ग्रस्त असलेल्यांना आरोग्य पथकाकडून काळजी घेण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. जिल्ह्यात असे 76,684 रुग्ण आहेत. या रुग्णांनी जास्तीत जास्त काळजी घ्यावी अशा सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या आहेत.

हे पण वाचाजगात भारी कोल्हापुरी ; मास्क नाही, प्रवेश नाही, ; मुंबईत झळकला कोल्हापूर पॅर्टन

 

 कोमॉर्बिड रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी 

तालुका            रुग्ण संख्या      
* मंडणगड           1687
* दापोली            6531
* खेड               7570
* गुहागर             6035
* चिपळूण          12114
* संगमेश्‍वर         10774
* रत्नागिरी          13246
* लांजा                6550
* राजापूर              7854
* शहरी भाग           4323

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ratnagiri has a high incidence of comorbid disease which is a threat to corona