
रत्नागिरी : पुराने गेले वैतागून, रात्र सारी जागून!
खेड : शहरासह तालुक्यात पावसाची रिमझिम सुरू आहे. गेल्या २४ तासांत तालुक्यात ७४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे; तर जगबुडी आणि नारंगी नद्यांना आलेला पूर ओसरला असला तरी दोन्ही नद्या इशारा पातळीवरून वाहत आहेत. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना व व्यापाऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पावसामुळे दैनंदिन व्यवहार ठप्प झाल्याने आज बाजारपेठेत गर्दी कमी प्रमाणात आढळून आली. पुराचे पाणी बाजारपेठेत शिरण्याच्या भीतीमुळे व्यापाऱ्यांनी सोमवारची रात्र जागून काढली.
पावसाच्या मुसळधार सरी अधूनमधून कोसळत असल्याने शक्यतो महत्वांच्या कामा व्यतिरीक्त कोणीही घराबाहेर पडताना दिसलेले नाही. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील वाहतूक कमी आहे. मुंबई -गोवा महामार्गावर देखील परशुराम घाट येथे सोमवारी दरड कोसळल्याने खबरदारीचा उपाय म्हणून घाटातील वाहतूक बंद ठेवली आहे. परिणामी अवजड वाहनांच्या रांगा पिरलोटे ते गुणदे फाटा या दरम्यान लागल्या आहेत.
गोव्याच्या दिशेने जाणारी लहान वाहने पिरलोटे चिरणी- कळबंस्तेमार्गे वळविण्यात आली आहेत. मुंबई - गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी चौपदरीकणातील कॉक्रीट रस्त्याला भेगा गेल्या आहेत. त्यामुळे वाहन चालकांनी वाहने सावकाश चालविण्याचे आवाहन केले आहे. महामार्गावर भरणे, जगबुडी पुल, लवेल आदी ठिकाणी महामार्गाला जोडणाऱ्या सर्व्हीस रोडवर चिखलाचे साम्राज्य पसरले आहेत. अनेक दुचाकी व तीनचाकींचे लहान मोठे अपघात होत आहेत.
खाडीपट्ट्याकडील रस्त्यावर पाणी
रात्री नारंगी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली होती. खेड - दापोली मार्गावरील सुर्वे इंजिनिअरिंगच्या रस्त्यावर पाणी आल्यामुळे या रस्त्यावरील वाहतुक काही काळ ठप्प झाली होती. खेडहून सुसेरी खाडीपट्ट्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी आल्याने तो रस्ता बंद झाला होता.
बंदर नाका येथे पुराचे पाणी
काल (ता. ४) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. त्यामुळे खेड मच्छी मार्केट परिसरासह बंदर नाका या ठिकाणी पुराचे पाणी आले होते. त्यामुळे मच्छी मार्केटमधील व्यापाऱ्यांची सुटका करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी बोटींचा वापर करून त्यांना सुरक्षित स्थळी हलविले. पावसाचा जोर वाढल्याने रात्री नारंगी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली होती.
एक नजर...
२४ तासांत तालुक्यात ७४ मिलिमीटर पावसाची नोंद
जगबुडी आणि नारंगी नद्यांचा पूर ओसरला
दोन्ही नद्या वाहताहेत इशारा पातळीवरून
परशुराम घाट येथे सोमवारी दरड कोसळली
पिरलोटे चिरणी- कळबंस्ते मार्गे लहान वाहने वळवली
महामार्गाला जोडणारा सर्व्हिस रोड चिखलमय
मच्छी मार्केटमधील व्यापाऱ्यांची सुटका
पाणी ओसरल्याने वाहतूक
नारंगी नदीच्या पुराच्या पाण्यामुळे सुसेरी बौद्धवाडी, चिंचघर-प्रभूवाडी येथील रस्ते पाण्याखाली गेले होते. परंतु, पहाटेपासून पावसाचा जोर कमी झाल्याने पुराचे पाणी ओसरले असून, पुराचा धोका टळलेला आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागासह पावसाची रिमझिम सुरूच आहे.
Web Title: Ratnagiri Heavy Rain Sporadic Crowds In The Market
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..