चार गुंठे जागेसाठी नगरपालिका मोजणार आता 1 कोटी पेक्षा जास्त रक्कम

राजेश शेळके
Saturday, 14 November 2020

या प्रकरणाला भ्रष्टाचाराचा वास येत असल्याने सत्ताधाऱ्यांकडे संशयाने पाहिले जात आहे. 

रत्नागिरी : रत्नागिरी पालिका सुमारे चार गुंठे जागेसाठी 1 कोटी 23 लाख रुपये मोजायला तयार झाली आहे. हा चमत्कारीक आकडा आला कोठून? अशी जोरदार चर्चा शहरात रंगली आहे. शहरात कुठेही गुंठ्याला एवढा दर नाही मग हा दर आला कुठून? महागडी जमीन पालिकेला हवी कशाला? त्यामागे काही आर्थिक गणिते आहेत का? असे अनेक प्रश्‍न आता रत्नागिरीकरांच्या मनात घोळत आहेत. या प्रकरणाला भ्रष्टाचाराचा वास येत असल्याने सत्ताधाऱ्यांकडे संशयाने पाहिले जात आहे. 

हेही वाचा -  रत्नागिरीत ८ कोटींच्या प्रस्तावात होणार १३ धरणांची दुरुस्ती -

शहरातील परटवणे आलीमवाडीतील जमीन खरेदीने सर्वच अवाक्‌ झाले आहेत. 3.88 गुंठे जमिनीची त्रिसदस्य समितीने 1 कोटी 23 लाख किंमत केली आहे. त्या किंमतीला ही जमीन विकत घ्या, असा सल्ला पालिकेला दिला आहे. या जमिनीचे मूल्यांकन नगर रचनाकार विभागाने केले आहे, असे पालिकेचे म्हणणे आहे. 30 मार्च 2019 ला झालेल्या खरेदीखताची किंमत बाजारभावाने 24 लाख होती, पण ती 17 लाखाला विकत घेतली. रजिस्टर कार्यालयाच्या म्हणण्यानुसार या जमिनीचा बाजारभाव 24 लाख आहे पण 17 लाखाला त्यांचे खरेदीखत झाले. 

मुळात प्रश्न असा निर्माण होतो की, हे खरेदीखत असताना त्रिसदस्य समितीने दर ठरवताना एका वर्षात या जमिनीचा दर पाचपट कसा वाढला? या जमिनीची किंमत 24 लाख आहे. त्याच्या दुप्पटकरून 48 लाख आणि त्यावर 25 टक्के रक्कम वाढवली तरी 60 ते 70 लाखाच्या वर जात नाही. मग 1 कोटी 23 लाख ही रक्कम कशी ठरवली? असा सवाल उपस्थित होत आहे. समितीने दर ठरविण्यासाठी जागामालकाने दोन बिल्डरनी या परिसरात घेतलेल्या जमिनीचे खरेदीखत जोडले होते. 

बिल्डरनी ही जमिन खरेदी रेडिरेक्‍नर पेक्षा कितीतरी अधिक दराने केली होती, अशी चर्चा आहे. मुळात या जमिनीचे खरेदीखत केवळ 17 ते 18 महिन्यापूर्वी केलेले असताना मागील 3 वर्षापूर्वीचे खरेदीखत जोडून ही वाढीव रक्कम कुठून आली? या जमिनीच्या खरेदी व्यवहारात अनेकांचे इंटरेस्ट असल्याचे बोलले जाते. एवढी रक्कम अदा करण्याची घाई सुरू झाली आहे. भाजप या विषयाच्यामागे आहे. 

हेही वाचा - साडेतेरा तासात २०० किलोमीटरचा प्रवास ; चिपळुणातील तीन सायकलस्वारांची कमाल -

पंधरामाड नवानगर येथील जमीन ही तत्कालीन नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी सचिन पिलणकर यांच्याकडून 5 लाख रुपये गुंठाने घ्यायचे निश्‍चित झाले होते; मात्र दरावरून व्यवहार फिस्कटला आणि जागा रद्द केली गेली. अन्य दोन जागा सीआरझेडमध्ये आहेत म्हणून पालिका नाकारत आहे; मात्र त्याच जागांवर मोठमोठे टॉवर, बिल्डिंग उभारायला पालिकेने परवानगी दिल्याचे समजते. 
 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ratnagiri municipal corporation give a 1 crore for 4 guntha land in ratnagiri amount was very high