केंद्र सरकारने वाढविले पेट्रोलचे दर अन् राष्ट्रवादीने काढला बैलगाडी मोर्चा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

मोदी सरकार हाय हाय, पेट्रोल डिझेलचे दर कमी करा, सर्वसामान्यांना दिलासा द्या, केंद्र सरकारचा निषेध असो, अशा घोषणा पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या.

सावंतवाडी - पेट्रोल डिझेलचे दर वाढवून केंद्रातील भाजप सरकारने सर्वसामान्यांचे आर्थिक कंबरडे मोडल्याचे काम केले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरील बाजार दरानुसार पेट्रोल डिझेलचे दर कमी करावे व जनतेला दिलासा द्यावा, या मागणीसाठी आज येथील राष्ट्रवादीच्या वतीने बैलगाडी आंदोलन करून तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना निवेदन दिले.

मोदी सरकार हाय हाय, पेट्रोल डिझेलचे दर कमी करा, सर्वसामान्यांना दिलासा द्या, केंद्र सरकारचा निषेध असो, अशा घोषणा पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या. त्यांनी दिलेल्या निवेदनात एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य जनता आर्थिक टंचाईचा सामना करत असताना केंद्रातील भाजप सरकार कडून गेल्या पंधरा दिवसापासून पेट्रोल डिझेलच्या दरात भरमसाठ वाढ केली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे दर कमी असताना केंद्र सरकारकडून मात्र हे दर भरमसाठ वाढवले जात आहेत. यामुळे जनतेमध्ये भाजप पुरस्कृत केंद्र सरकारच्या विरोधात प्रचंड रोष निर्माण झाला आहे. तरी केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय पातळीवरील दरानुसार पेट्रोल डिझेलचे दर कमी करून जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

हे पण वाचा - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अजूनही ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ 

 

यावेळी प्रदेश सचिव सुरेश गवस, प्रांतिक सदस्य उदय भोसले, सामान्य न्याय विभाग जिल्हाध्यक्ष विजय कदम, शहर अध्यक्ष सत्यजित धारणकर, माजी नगरसेवक अफरोज राजगुरू, महिला तालुका अध्यक्ष रंजना निर्मल, व्यापार-उद्योग सेल जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी, ऑगस्टिन फर्नांडिस, अशोक पवार, विलास पावसकर, इप्तकार राजगुरू, गुरुदत्त कामत, आर्यन रेडीज, चित्र देसाई आदी पदाधिकारी उपस्थित होते.

शहरातील पर्णकुटी विश्रामगृहात येथून बैलगाडीतून बसून तहसील कार्यालयापर्यंत जात पदाधिकाऱ्यांनी हे अनोखे आंदोलन केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ratnagiri ncp protest against increase petrol rate