मिरकरवाडा बंदरातील दीड लाख क्युबिक मीटर गाळाचा उपसा

राजेश कळंबटे
रविवार, 18 मार्च 2018

रत्नागिरी - मिरकरवाडा बंदर टप्पा 2 मध्ये गाळ आणि संरक्षक भिंत बांधण्याचे काम अजूनही सुरुच आहे. आत्तापर्यंत दीड लाख क्युबिक मीटर गाळ काढून झाला आहे. दुसरा टप्पा काम पूर्ण करण्यासाठी ३१ मे पर्यंतची मुदत आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करावे लागणार आहे.

रत्नागिरी - मिरकरवाडा बंदर टप्पा 2 मध्ये गाळ आणि संरक्षक भिंत बांधण्याचे काम अजूनही सुरुच आहे. आत्तापर्यंत दीड लाख क्युबिक मीटर गाळ काढून झाला आहे. दुसरा टप्पा काम पूर्ण करण्यासाठी ३१ मे पर्यंतची मुदत आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करावे लागणार आहे.

मिरकरवाडा टप्पा 2 मधून बंदरात येणारा गाळ कायमस्वरुपी काढतानाच मच्छीमारांना लागणार्‍या सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. सुरवातीला मशिदीजवळील संरक्षक भिंतीची लांबी दीडशे मीटरने वाढविणे आणि पांढरा समुद्र येथे 525 मीटरची भिंत बांधण्याचे काम हाती घेतले. समद्रातून येणारा गाळ बंदरात शिरू नये यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे. या भिंतीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पांढरा समुद्राजवळील भिंतीस शेवटचा आकार देण्याचे काम सुरु आहे. या भिंतीवर सुमारे 52 कोटी खर्च झाले आहेत. ही कामे पूर्ण करण्यासाठी 31 मे 2018 पर्यंतची डेडलाईन देण्यात आली आहे;

स्लोपिंग हार्ट (नौका दुरुस्तीसाठी रॅम्प) उभारणे, अंतर्गत रस्ते, निवारा शेड, उपाहारगृह, साहित्य ठेवण्याची शेडस्, लिलावगृह, शौचालये, यासह चार जेट्यांची दुरुस्तीच्या कामांना सुरवात झालेली नाही. बंदरात उभ्या केलेल्या नादुरुस्त नौका काढून नेण्यासाठी मच्छीमार सोसायटीने मत्स्य विभागाला पत्र दिले आहे. त्याचीही अंमलबजावणी झालेली नाही.

फ्लोटिंग ड्रेझरद्वारे गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. आतापर्यंत दीड लाख क्युबिक मीटर गाळ काढून झाला आहे. बुधवार, शुक्रवार नौका बंदरातच उभ्या असल्याने ड्रेझर बंद राहतो. उर्वरित पाच दिवस गाळ काढला जातो. पहिल्या दोन जेटीतील गाळ काढून झाला असून शेवटच्या दोन जेट्यांमधील गाळ काढायचे काम सुरु करावयाचे आहे.

एका जेटीत  जुन्या नौका ठेवण्यात आलेल्या आहेत. त्या काढण्यावरुन मच्छीमार आणि प्रशासन आमनेसामने आलेले आहे. मच्छीमार सोसायटीने त्या नौका काढाव्यात असे पत्र दिले आहे. पण मत्स्य विभागाकडून एमएमबी आणि कंत्राटदाराला पत्र गेले नसल्याने काम थांबले आहे.

सर्व्हेक्षणानुसार अडीच लाख क्युबिक मीटर गाळ काढावयाचा होता. अजून एक लाख क्युबिक मीटर गाळ काढावा लागणार आहे. यावर तोडगा काढण्यासाठी मत्स्य विभागाकडून पावले उचलावी लागणार आहेत.

बंदरातील नादुरुस्त मच्छिमारी नोका काढण्यासाठी सोसायटीकडून पत्र दिले आहे. त्याची अमलबजावणी केली जात नाही.
- सुलेमान मुल्ला,
मच्छिमार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ratnagiri News 150,000 cubic meters of puddle in Mirarkwara port