जीव मुठीत धरून हजारोंचा होडीतून प्रवास

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 मे 2018

राजापूर - राजापूर आणि लांजा तालुक्‍यातील सुमारे पंधरा गावांना एकमेकांशी जोडणारा मुचकुंदी नदीवर गोळवशी-इंदवटीजवळ पूल व्हावा,अशी या भागातील लोकांकडून गेल्या कित्येक वर्षापासून मागणी केली जात आहे. त्याकडे लोकप्रतिनिधींसह प्रशासनाकडून झालेल्या दुर्लक्षामुळे ही मागणी प्रलंबित आहे.

राजापूर - राजापूर आणि लांजा तालुक्‍यातील सुमारे पंधरा गावांना एकमेकांशी जोडणारा मुचकुंदी नदीवर गोळवशी-इंदवटीजवळ पूल व्हावा,अशी या भागातील लोकांकडून गेल्या कित्येक वर्षापासून मागणी केली जात आहे. त्याकडे लोकप्रतिनिधींसह प्रशासनाकडून झालेल्या दुर्लक्षामुळे ही मागणी प्रलंबित आहे. त्यामुळे सुमारे पंधरा गावातील हजारो लोकांना ये-जा करण्यासाठी जीव मुठीत घेवून होडीतून प्रवास करावा लागत आहे. 

मुंचकुंदी नदीमुळे राजापूर आणि लांजा तालुक्‍याचे दोन भाग झाले असले तरी, या दोन्ही बाजूच्या गावांमधील लोकांचा विविध कारणाने एकमेकांशी नातेसंबंध जोडले गेले आहेत.

लांजा तालुक्‍यातील गावांमध्ये बाजारपेठ विकसित झाली असून त्या ठिकाणी विविध प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे राजापूर तालुक्‍यातील वडदहसोळ पंचक्रोशीतील गावांमधील ग्रामस्थ बाजारासाठी ओणी परिसरामध्ये येण्याऐवजी लांजा तालुक्‍यात जाणे पसंत करतात.

उन्हाळ्यामध्ये कोरडे  पात्र ओलांडून लांज्यात जाणे सोयीचे ठरते. मात्र पावसाळ्यात या गावांचा एकमेकांशी संपर्क तुटतो. या भागातील लोक होडीतूनही प्रवास करतात. त्यामुळे मुचकुंदी नदीवर गोळवशी-इंदवटीजवळ पूल बांधावा,अशी या भागातील लोकांची मागणी आहे. मात्र, त्याकडे लोकप्रतिनिधींसह प्रशासनाकडून दुर्लक्ष झाले.लोकांची समस्या लक्षात घेवून रखडलेला पूल तातडीने व्हावा,अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.  

अद्यापही पूर्तता नाही
राजापूर आणि लांजा तालुक्‍यांना जोडणाऱ्या मुचकुंदी नदीवरील पुलाच्या मागणीसाठी राजापूर-लांजा तालुक्‍यातील युवकांनी स्थापन केलेल्या मुचकुंदी परिसर विकास संघ जोरदार प्रयत्नशील आहे. या मागणीच्या पूर्ततेसाठी त्यांनी लोकप्रतिनिधींसह संबंधितांना यापूर्वी अनेकवेळा निवेदने दिली आहे. मात्र पुलाच्या मागणीची पूर्तता झालेली नाही.

Web Title: Ratnagiri News traveling in Muchkundi river